भिवंडी : भिवंडीमधील एसटी चालकाच्या मृत्यूविरोधात चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले. ठाणे, भिवंडी, नांदेड, कंधार, बिलोली, मुरबाड, हदगाव, तसंच कल्याणचे एसटी डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.


रिक्षा हटवण्याच्या वादावरुन बुधवारी रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

रिक्षाचालकांची बेदम मारहाण, भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू

आंदोलनादरम्यान चालक आणि वाहकांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी, प्रवासांचा मोठा खोळंबा झाला.

भिवंडीत कालपासूनच बसचालकांचं आंदोलन सुरु आहे. तर आज सकाळी ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. ठाणे डेपोमधून भिवंडी, बोरीवली, मीरा-भाईंदर, वसईकडे जाणारी वाहतूकही ठप्प होती. तसंच ठाण्यातून खोपटमधील एसटी डेपोही पूर्णपणे बंद होता.

भिवंडीत बसचालकाच्या मृत्यूचे ठाणे डेपोतही पडसाद

दरम्यान एसटी चालकांच्या आंदोलनानंतर ठाणे आरटीओने कारवाई करत 50 रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.

याशिवाय नांदेड आणि तुळजापूरातील एसटी चालकांनीही आंदोलनात सहभाग नोंदवल्याने वाहतूक ठप्प झाली होती.