पुणे : यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे नियोजित बस फेऱ्या व्यतिरिक्त सुमारे 3 हजार 724 जादा बसेस सोडण्यात येणार असून महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देणार आहेत. यासाठी एसटीचे सुमारे 5 हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे 10 जुलै ते 16 जुलै पर्यंत अहोरात्र कार्यरत राहतील अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
ते पुणे येथे आषाढी एकादशी निमित्त करावयाच्या वाहतूक नियोजन बैठकीमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की , पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे, यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे.
भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे, विठ्ठलाचे दर्शन घडवून सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या एसटीवर आहे. त्यासाठी जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस या यांत्रिक दृष्ट्या निदोष, तंदुरुस्त असल्या पाहिजे तसेच त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहावे, असे आदेश पारित झाले आहेत.
माईल्ड स्टीलच्या 1200 आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी
या बैठकीमध्ये एसटी महामंडळाच्या विविध विभागांनी आषाढी यात्रेच्या दृष्टीने केलेले नियोजन सादर केले. त्यानुसार 3 हजार 724 बसेस पैकी, नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे 1200 आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणाऱ्या विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विभाग निहाय तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे.
प्रदेशनिहाय जादा बसेसचे नियोजन
औरंगाबाद - 1097
पुणे - 1080
नाशिक - 692
अमरावती - 533
मुंबई - 212
नागपूर - 110
यात्रा काळात बसस्थानकावर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय अशा मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवाशी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विठ्ठल भक्तांसाठी एसटी सज्ज, आषाढी एकादशीसाठी एसटीच्या साडेतीन हजार बस धावणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2019 07:13 PM (IST)
पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे, यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -