लालपरी ते शिवनेरी, एसटी बस तिकीटदरात किती रुपयांची वाढ?
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2018 05:41 PM (IST)
एकीकडे खासगी गाड्या स्वस्तात सेवा देत असताना एसटीचा प्रवास मात्र महागडा होत चालला आहे.
बीड/मुंबई : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या तिकीटदरात आज (15 जून) मध्यरात्रीपासून 18 टक्के वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चाप बसणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलं आहे. याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. तसेच आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारला जाईल.
सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असं एसटी महामंडळाने म्हटलं आहे. डिझेलचे दर वाढले म्हणून भरभक्कम दरवाढ करणाऱ्या एसटीने आता कोण कशाला प्रवास करेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण एकीकडे खासगी गाड्या स्वस्तात सेवा देत असताना एसटीचा प्रवास मात्र महागडा होत चालला आहे. या दरवाढीमुळे शिवनेरीच्या तिकीटदरात भरमसाठी वाढ झाली आहे. नुकतीच सुरु झालेली शिवशाहीसुद्धा आवाक्याबाहेर जात आहे. तर साध्या गाडीच्या दरातही घसघशीत वाढ झाली आहे. खासगी गाड्या त्याच दरात सेवा देत असताना, एसटीला मात्र त्याच दरांमध्ये सेवा का देता येत नाही, असा प्रश्न आहे. एसटी बसचे जुने आणि नवे दर