Maharashtra ST Bus: दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या सिल्वासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते, मंगळवारी 25 एप्रिल रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रम जरी सिल्वासामध्ये असला तरी फायदा एसटी महामंडळाचा (Maharashtra ST Bus) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या 500 बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीव-दमण आणि गुजरातच्या दौऱ्यावर (PM Modi in Gujarat) असणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. लोकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या बसेस (ST Buses) वापरण्यात येणार आहेत. आज, महाराष्ट्रातून जवळपास 500 बसेस गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार या आगारातून 70 बसेस रवाना करण्यात आल्यात आहेत. त्याशिवाय, रायगडसह नाशिक, धुळे आदी जिल्ह्यातील आगारातून एसटी बसेसची पाठवण्यात आल्या आहेत. या भागातील एसटी बसेस प्रवाशांसाठी वापरण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी एसटी बसेस सिल्वासात जात असल्याने रस्त्यावर एसटी बसची रांग दिसून आली होती. या बसेस पूर्णपणे रिकाम्या होत्या. त्यामुळे लोकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. अखेर या बसेस सभेसाठी जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर चर्चांना पूर्णविराम लागला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असा आहे कार्यक्रम


पंतप्रधान नरेंद्र मोदी दादरा आणि नगर हवेली येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करतील. अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 एप्रिल रोजी 'नमो मेडिकल कॉलेज' चे उद्घाटन करण्यासाठी दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा येथे दाखल होतील. मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान सिल्वासा जवळील सायली गावात झालेल्या बैठकीला संबोधित करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी ते संपूर्ण केंद्रशासित प्रदेशासाठी विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करतील. यावेळी 4,804.64 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रशासित दमण शहराला भेट देतील. या ठिकाणी पंतप्रधान मोदी रोड शो करतील. पंतप्रधान 26 एप्रिल रोजी गुजरात राज्यातील सोमनाथ येथे सौराष्ट्र तामिळ संगम कार्यक्रमात उपस्थित राहतील. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: