PM Modi : पंतप्रधान मोदी 24 एप्रिलपासून 36 तासांत देशात उत्तर ते दक्षिण असा विविध भागांमध्ये 5,000 किमीपेक्षा जास्त अंतराचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते सात ते आठ कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून ते सात वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करतील. 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीपासून त्यांचा दौरा सुरु होईल. पीएम मोदी प्रथम मध्य प्रदेशमध्ये दौरा करतील. त्यानंतर ते दक्षिणेत केरळ दौरा करतील. त्यानंतर पश्चिमेकडील केंद्रशासित प्रदेशात त्यांचा मुक्काम होईल आणि नंतर राजधानी दिल्लीत परत येतील, असे अधिकाऱ्यांनी आज (22 एप्रिल) माहिती देताना सांगितले. 


पीएम मोदींचा कसा असणार दौरा?


पंतप्रधानांच्या प्रदीर्घ दौऱ्याची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी प्रवासाला सुरुवात करतील. ते दिल्ली ते खजुराहो असा सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास करतील. खजुराहोमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर ते  रेवामध्ये राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते खजुराहोला परत येतील.  सुमारे 280 किमीचे अंतर कापून खजुराहो येथून ते कोचीकडे प्रयाण करतील. कोचीमध्ये ते युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होतील. हे अंतर सुमारे 1700 किलोमीटरचे हवाई अंतर असेल. 


केरळमधून सिल्वासाला जाणार


दुसऱ्या दिवशी पंतप्रधान कोची ते तिरुअनंतपुरम असा प्रवास करताना सुमारे 190 किमी अंतर कापतील. येथे ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. येथून ते सिल्वासा येथे सुरत मार्गे जातील. हा प्रवास सुमारे 1570 किलोमीटरचा प्रवास असेल. तेथे ते नमो मेडिकल कॉलेजला भेट देतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 


सीफ्रंटच्या उद्घाटनासाठी दमणला जाणार


त्यानंतर पीएम मोदी देवका सीफ्रंटच्या उद्घाटनासाठी दमणला जातील, त्यानंतर ते सुमारे 110 किलोमीटर अंतरावर सुरतला जातील. त्यानंतर ते सुरतहून दिल्लीला परततील. हा प्रवास नियोजित वेळापत्रकात आणखी 940 किमी जोडेल. त्यामुळे या संपूर्ण प्रवास पंतप्रधान सुमारे 5,300 किमी विमान प्रवास करताना दिसतील. त्यामुळे पंतप्रधानांचा देशाचा उत्तर ते दक्षिण असा प्रवास होणार आहे. तो केवळ 36 तासांमध्ये होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या