मुबंई: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत एसटी महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांना खुषखबर दिली आहे. एसटीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. महागाई भत्ता 119 वरुन 125 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात तब्बल 6%ची वाढ करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2016 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकी रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही ऑगस्ट 2016च्या वेतनात देण्यात येणार आहे.
उर्वरित 75 टक्के रक्कम ही एसटीकडून लवकरच देण्यात येणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, एसटीच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना गणपती उत्सव आनंदात साजरा करता येणार आहे.