SSC Result 2022: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता सर्वांनाच दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. दहावीचा निकाल कधी लागणार याकडं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाचे 16 लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाची उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  त्यामुळे येत्या आठवडाभरात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल ऑनलाइन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे.


15 जूनपर्यंत निकाल लागण्याची शक्यता


बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल असं राज्याच्या शिक्षण मंडळाकडून या आधी सांगितलं होतं. पुढच्या चार ते पाच दिवसात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. 15 जूनपर्यंत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र बोर्डाने  काल म्हणजे 8 जून रोजी बारावीचा निकाल जाहीर केला. दहावीची पेपर चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिल्यावर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील विनाअुनदानीत शाळांच्या शिक्षकांनी या आधी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळं दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं. आता त्या प्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळं लवकरच दहावीचाही निकाल लागण्याची अपेक्षा आहे. 


दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती


यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.


महत्वाच्या बातम्या: