पुणे : राज्यभरात आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे.

दरम्यान, उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, यासाठी त्यावर बारकोड असणार आहेत. उत्तरपत्रिकेवर यापूर्वीही बारकोड असायचा. मात्र यावर्षीपासून पुरवणीवरही बारकोड असेल.

यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये :

  • दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी

  • 9 लाख 73 हजार 134 विद्यार्थी, तर 7 लाख 78 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश

  • 16 लाख 37 हजार 783 नियमित विद्यार्थी, 67 हजार 563 पुनर्परीक्षार्थी आणि 46 हजार 7 इतर (खाजगी श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषयासह प्रविष्ठ)

  • बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठीही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावरह पोहोचणं अनिवार्य

  • गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी, मागच्या वर्षी 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी होते

  • संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 657 परीक्षा केंद्र

  • दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 252 भरारी पथकांची नियुक्ती


एबीपी माझाकडूनही दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा!