लातूर/बीड : राज्यात कॉपीमुक्त परीक्षा धोरणावर शिक्षण विभागाचं काम सुरु असतानाच या अभियानाला कॉपीबहाद्दरांनी हरताळ फासला आहे.  लातूर आणि बीडमध्ये आज सकाळी इंग्रजीचा पेपर सुरु होताच काही मिनिटांमध्येच व्हॉट्सअपवर वायरल झाला.


लातूर जिल्ह्यातील अबुलगा गावात दहावीच्या इंग्रजीच्या पेपरवेळी सरास कॉपी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या परीक्षा केंद्रावर बैठं पथक आणि कडक पोलीस बंदोबस्त असतानादेखील कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट दिसून आला. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि बैठं पथकाची कॉपीप्रकाराला साथ देत असल्याची शंकाही घेतली जात आहे.

दरम्यान बीडमध्येही सकाळी 11 वाजता दहावी इंग्रजीचा पेपर सुरु होताच तो व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमधील शिवगर्जना सरकार ग्रुपवर हा पेपर वायरल करण्यात आला होता. हा पेपर रिपीटर्स म्हणजेच पुन:परीक्षार्थींसाठी घेण्यात आलेल्या जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याची माहिती आहे.