अकोला : मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा, असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आता मी भूमिका बदलणार आहे. सुपारी घेऊन ट्रोल करणाऱ्यांना कार्यकर्ते बघतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


पत्रकारांबद्दल बोलणार नाही. मात्र राजकीय लोकांबद्दलही ही भूमिका असणार आहे. मोठ्या हुकूमशाहाशी लढण्यासाठी काही गोष्टी हुकूमशाहासारख्या कराव्या लागतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह संवेदनशील नव्हते. अमित शाहांनी हल्ल्याशी संबंधित वायरल केलेले फोटो 2005 मधील होते, असा दावाही आंबेडकरांनी केला. भाजपचा इतिहास विश्वासार्हतेचा नाही. भाजपबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.



पुलवामा हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता, हे अद्यापही समजलेलं नाही. फक्त हल्ला करु शकतो हे दाखवायचं असेल तर असं बरेचदा केलेलं आहे. एअर स्ट्राईकचा जुमला होऊ नये म्हणून मोदींनी एअर स्ट्राईकचे फोटो जनतेसमोर आणावे. असं झालं नाही तर हे राजकीय नाट्य आहे, असा समज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल, असाही इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.

आम्हाला गांधीवादी काँग्रेस हवी, मनुवादी नको. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीसाठी कोणताही निरोप आलेला नाही, असं सांगतानाच राजकारणातील सध्याच्या पिढीशी संवाद ठेवावा वाटत नसल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.