ठाणे: गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता अभियान सुरु आहे. यात राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही सहभागी झाले. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यात राखीव दलाच्या पोलिसांनी स्वच्छता अभियान राबवलं. अंबरनाथ तालुक्यात तळोजा रोडवर असलेलं नाऱ्हेण गाव राज्य राखीव दलाच्या बाळेगाव तुकडीने दत्तक घेतलं आहे. यावेळी राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक रवींद्र महापदी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
या तुकडीच्यावतीनं या गावात नेहमी प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. याचअंतर्गत आज गांधी जयंतीचं औचित्य साधत नाऱ्हेण गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात राज्य राखीव दलाचे सुमारे 550 जवान सहभागी झाले होते.
शिवाय नाऱ्हेण गावातले ग्रामस्थ, स्त्रिया, लहान मुलं यांचाही सहभाग मोठा होता. या सगळ्यांनी गावातले रस्ते, शाळेचा परिसर, निवासी भाग या परिसरात स्वच्छता करून गाव स्वच्छ केलं. यावेळी ग्रामस्थ आणि जवानांनी स्वच्छतेची शपथही घेतली.