मुंबई: एका अपहाराच्या घटनेवरून एसटीच्या सर्व वाहकांना संशयाच्या कठड्यात उभे करून, वेठीस धरणे हा केवळ मूर्खपणा आहे. तसेच अपहार रोखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या खिशात हात घालून झाडझडती घेण्याचे उद्दाम परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी ताबडतोब समज द्यावी, अन्यथा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अशा उद्दामखोर परिपत्रकमुळे उद्रेक होऊन त्याचा परिणाम आंदोलनामध्ये होईल. महामंडळाने तशी वेळ आणू नये,असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे  (Srirang Barge) यांनी दिला आहे. 


काय म्हणाले श्रीरंग बरगे?


इस्लामपूर(सांगली जिल्हा) आगारांमध्ये एका वाहकाने अँड्रॉइड मोबाईलमध्ये ॲप तयार करून  त्याद्वारे तिकीट विक्री करून अपहार केला. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवण्याचा प्रकार घडला, ही घटना दुर्दैवी आहे. पण अशा घटनांमधून एसटीच्या तांत्रिक यंत्रणेचा दोष दिसून येत आहे. एसटीच्या मध्यवर्ती संगणकीय कक्षाचे तिकीट विक्री मशीनवर नियंत्रण असताना असा प्रकार त्यांच्या लक्षात का आला नाही? त्यांना विचारणा करण्याऐवजी  राज्यातील सर्व एसटी वाहकांची तपासणी करावी, किंबहुना महिला वाहकांचे खिसे तपासावेत असे तुघलकी फर्मान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले आहे. 


अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला वाहकांचे मनोधैर्य खचत आहे. भविष्यात आपल्या कामगिरीबद्दल नैराश्य निर्माण होऊन त्यातून कर्मचाऱ्यांच्यामध्ये उद्रेक निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी साडे पाच महिने संपात होरपळलेल्या एसटीला आणखी एका मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये , यासाठी अशा बेजबाबदारपणे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना  वरिष्ठांनी समज द्यावी असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.


राज्यातील 5000 एसटी बसेस LNG वर धावणार


राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) या पर्यायी इंधनावर चालणार आहेत. त्यामाध्यमातून एसटी महामंडळाचे वर्षाला 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे. यासाठी किंग्ज गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 


या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाचे दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


ही बातमी वाचा :