मुंबई : नियमीत लसीकरण मोहिमेव्यतिरीक्त मिशन इंद्रधनुष्य अभियानांतर्गत 2018 अखेर 90 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील प्रत्येक 22 तारखेला दोन वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे, असं दीपक सावंत यांनी सांगितलं. या विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत आज आढावा घेण्यात आला.

केंद्र सरकारकडून मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येतं. राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये नियमित लसीकरणाव्यतिरीक्त विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. दोन वर्षाच्या आतील बालके, गरोदर मातांना सर्व प्रकारच्या लसी या अंतर्गत देण्यात येतात.

2018 अखेर संपूर्ण देशात मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून 90 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. त्यासाठी देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्राने लसीकरणाचं नियोजन केलं असून तीनही महिन्यातील प्रत्येक 22 तारखेला ती राबवण्यात येणार असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं.

या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागामार्फत सहा जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत सर्व्हे देखील करण्यात येत आहे. राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नेमण्यात आली असून या समितीमार्फत विशेष लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात येईल.

राज्य कृती दल आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या लसींचा साठा पुरेसा असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.