रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने कालपासून 162 ट्रेन सोडण्याचं नियोजन केले आहे. यातील काही ट्रेन ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहेत. काल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला जाणारी पहिली ट्रेन रात्री साडे आठ वाजता सुटली. या पूर्ण रेल्वेत फक्त 6 प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बसले तर ठाणे आणि पनवेल येथून 25 प्रवाशांनीच आरक्षण केले होते. 18 डब्यांच्या या गाडीत काल फक्त 30 प्रवाशीच होते.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाकरता स्पेशल ट्रेन्स सोडण्याची घोषणा झाली आणि चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र या ट्रेन्सला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरीचं उदाहरण पाहायचं झालं तर पहिली ट्रेन कुर्ला - रत्नागिरी ज्यात रत्नागिरीला केवळ 11 प्रवाशी उतरले.  दुसरी  ट्रेन CSMT - सावंतवाडी ज्यातून रत्नागिरीत केवळ 14 प्रवाशी उतरले तर तिसरी ट्रेन CSMT - कुडाळ - सावंतवाडी यातून केवळ 3 प्रवाशी रत्नागिरी स्टेशनवर उतरले आहेत.

पहिल्या ट्रेन्सला प्रतिसाद कमी मिळत असला तरी यापुढील ट्रेनला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे. पण, चाकरमान्यांना परतीच्या प्रवाशाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोकणात जाणाऱ्यांसाठी 'या' दिवसापासून धावणार कोकण रेल्वे!
मागील काही दिवसांपासून कोकणवासियांकरता कोकण रेल्वे सोडण्याच्या बातम्या येत होत्या. निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चारमान्यांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात होती. नेमका निर्णय कधी होणार? किती ट्रेन्स सुटणार? नियम काय असणार? याबाबतचं घोंगडं भिजत ठेवलेले होते. राज्य आणि केंद्र सरकारकडून याबाबत हिरवा कंदिल मिळाल्यानंतर या रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात अप आणि डाऊन अशा 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

 

काय असणार नियम?
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता ट्रेन्सनं प्रवास करण्याकरता काय नियम असणार याबाबत देखील उत्सुकता आहे. दरम्यान, अद्याप याबाबतची नियमावली समोर आलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक स्टेशनवर जिल्हा प्रशासनाचे काही कर्मचारी असणार असून ते येणाऱ्या प्रवाशांची माहिती किंवा त्यांची नोंद ठेवणार आहे.