मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचे सदस्य असलेल्या रियाज भाटी यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप करुन, राष्ट्रवादीनं खळबळ उडवून दिली आहे. इतकंच नाही तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भाटींना वाचवण्यासाठी भाजप सरकार आणि आशिष शेलार काम करत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


ज्या मोदींनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळण्याची प्रतिज्ञा केली होती, त्याच दाऊदशी भाजप नेत्यांचे संबंध असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. त्यातली महत्वाची कडी ठरलाय तो रियाज भाटी.



विल्सन जिमखान्याचा सर्वेसर्वा. एमसीएत शरद पवार आणि शेलारांच्या मांडीला मांडी लावून बसणारा रियाज भाटी.

रियाज भाटीचं प्रकरण गंमतीशीर आहे. फुलजी भाटी नावानं एक माणूस दाऊदच्या लोकांना भेटण्यासाठी जोहान्सबर्गला जाणार आहे, अशी टीप आयबीला होती. त्यामुळं फुलजी भाटी नावाच्या माणसाबद्दल आयबीनं रेडअलर्ट जारी केला. त्यानुसार वर्षभरापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2015 मध्ये फुलजी भाटीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी त्याची चौकशी केली. यात तो फुलजी नव्हे तर रियाज भाटी असल्याचं समोर आलं.

फुलजी उर्फ रियाज भाटीकडे 2 पासपोर्ट आढळून आल्याची माहिती आहे.  याप्रकरणी फुलजी उर्फ रियाज भाटीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र इतक्या संवेदनशील प्रकरणात रियाजला अवघ्या 15 दिवसात जामीन मिळाला.

90 दिवसात रियाजवर आरोपपत्र दाखल होणं आवश्यक असताना वर्षभरानंतरही कारवाई झाली नाही.

भाजपशी जवळीक असल्यानंच रियाजची सुटका झाली, आणि त्यानंतर आशिष शेलारांच्या कृपेनं त्यानं एमसीएत शिरकाव केल्याचा आरोपही नवा मलिकांनी केला आहे.

अर्थात भाजपनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि भाटीनंही आपण मलिकांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा टाकणार असल्याचं म्हटलंय.

कधीकाळी गुंडांशी आरोप असल्यानं राष्ट्रवादी बदनाम होती. आता काळाची चक्र उलटी फिरु लागलीत. परवाच कुख्यात पप्पू घोलप आणि शाम शिंदेला भाजपनं पावन करुन घेतल्यानं लोकांचे डोळे फिरले होते.

आता तर थेट दाऊदशी संबंध असल्याचा आरोप होतोय.. राजकारण परसेप्शनवर चालतं.. त्यामुळं स्वच्छ चारित्र्याच्या फडणवीसांनी याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे.

संबंधित बातमी


ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण 

रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार