कोल्हापूर: करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून येणाऱ्या दोन शालूंचा लिलाव आज झाला. गेल्या वर्षीच्या शालूला 77 हजार रुपये तर यंदाच्या शालूसाठी 5 लाख 5 हजार रुपयांची बोली लागली. मनिषा खोराटे यांनी 77 हजार रुपयाला तर सुभाष ऐमुल यांनी 5 लाख 5 हजार रुपयांना शालूची बोली लावत देवीचे महावस्त्र प्रसाद म्हणून घेतले .

अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून दरवर्षी शालू येतो. गेल्या वर्षी आणि यावर्षीच्या शालूंची एकत्रित लिलाव प्रक्रिया पार पडली.

गेल्या वर्षी  लिलावाची रक्कम 4 लाख 20 हजार पासून निश्चित केली होती. सुरुवातीची बोली अधिक असल्याने तीन वेळा प्रक्रिया घेऊनही याला प्रतिसाद मिळाला नव्हता, त्यामुळे आज ह्या शालूची 75 हजारपासून बोली लावण्यात आली. केवळ दोन बोलीतच 77 हजार रुपये किमतीला हा शालू साखरेचे व्यापारी मनिषा खोराटे यांनी खरेदी केला. त्यांनी यापूर्वी 5 लाख 55 हजार रुपये इतक्या विक्रमी किमतीने शालू खरेदी केला होता.  यावर्षी पुन्हा शालू मिळाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं.

2016 च्या शालूचा लिलाव 1 लाख रुपयांपासून सुरु झाला 1 लाख 10 हजार रुपायांपासून सुरु झालेल्या बोलीने बघता बघता 2 लाखाचा टप्पा गाठला. कोल्हापूरमधील इचलकरंजी येथील सुरेश आडके,बेंगलोर येथील बाळकृष्णन आणि पुण्यातील सुभाष ऐमुल यांच्यात बोलीत चांगलीच चढाओढ सुरु झाली.  त्यातून ही बोली 10 - 15 हजाराच्या पटीत वाढत गेली लाख रुपयांची बोली झाल्यानंतर सुरेश आडके आणि बाळकृष्णन यांनी बोली थांबवली तर बांधकाम व्यवसायिक सुभाष ऐमुल यांच्यावतीने बोली लावणाऱ्या सिद्धेश राणे यांनी 5 लाख 5 हजार बोली लावली ही बोली अंतिम ठरली .

मागील वर्षी शालूच्या लिलावात सरासरी काढण्यात येत असल्याने हा शालू लिलावात घेण्याकडे भाविकांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी शालूचा योग्य भाव लिलावद्वारे होत असल्याने भाविकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला.


रणजित माजगांवकर, एबीपी माझा, कोल्हापूर