मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असलेले रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप, दाऊद आणि एकूणच या वादाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाटींनी दिलं आहे.

दाऊशी आपला काहीही संबंध नाही. दाऊदचा माणूस असतो, तर आपल्याला संरक्षण कसं मिळालं असतं, असा सवाल रियाज भाटींनी केला आहे. माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, पण पासपोर्टप्रकरणात खटला सुरु आहे. मात्र माझ्याकडे दोन पासपोर्ट नाहीत, असा दावा भाटींनी केला

नवाब मलिकांवर खटला दाखल करणार

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही रियाज भाटी यांनी सांगितलं आहे.

दोन पासपोर्ट नाहीत

माझ्याकडे दोन पासपोर्ट असल्याचा आरोप चुकीचा आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये अडकलो असतो तर इतक्या लवकर सुटलो असतो का, असं विचारत गँगस्टरशी संबंध असणारा मुंबई कसा राहू शकेल, अशी टिपणीही त्यांनी केली.

भाजपशी आपला काहीही संबंध नाही, त्याचप्रमाणे माझा भाजपशी कोणताही वाद नाही. मी एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळेच आशिष शेलारांशी आपला संबंध येतो, त्याचप्रमाणे शरद पवारांशी भेट होते, असं भाटींनी स्पष्ट केलं आहे.

रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार


दाऊदशी कथित संबंध असणारे रियाज भाटी कोण आहेत हे पवारांना विचारा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला होता.

रियाज भाटी यांचे थेट दाऊदशी संधान असल्याचा दावाही मलिक यांनी केला होता. पण उलट शरद पवार यांनीच रियाज भाटी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं. त्यामुळे रियाज भाटी कोण हे पवारांना विचारा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे.

रियाज भाटी यांनी आशिष शेलारांना एमसीए निवडणूकीत मतं मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना धमकावल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण भंडारी यांनी त्यांचा संबंध थेट पवारांशी जोडून मलिक यांना जोर का झटका दिला आहे.

त्याप्रमाणे भाजपच्या सर्वच नेत्यांशी त्याचे जवळचे संबध आहेत, असा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र रियाज भाटी याचा भाजपशी अथवा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी कोणताही संबंध नाही, असा दावा भाजपनं केला आहे.