लातूर : शेख मौला हैदर साब, वय वर्ष अवघं 120. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग काय असतं हे त्यांना ठावूकच नसेल, एवढी त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. इतकंच नाही वयाची शंभरी उलटल्यानंतरही त्यांना साधा चष्मा लागलेला नाही. मौलाचाचांच्या नातवंडांनाही नातवंडं आहे. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन पाहिला. तीन दशकं पाहिलेल्या मौलाचांची कहाणी आज उलगडणार आहोत.


120 वर्षांच्या आजोबांचा ग्रामपंचायती निवडणुकीतल्या मतदानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रश्न पडला, हे आजोबा खरंच 120 वर्षांचे आहेत? याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाची टीम लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामधील भोकरंभा गावात पोहोचली.



मौलासाहेबांना एकूण चार मुले आणि दोन मुली. थोरला मुलगा शेख इस्माईल, ते आज 84 वर्षांचे आहेत. दुसऱ्या मुलाचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या नंतरच्या शेख शाबीराबी यांचं वय 60 वर्ष आहे. शाबीराबीच्या मुलीच्या मुलीला सात वर्षाचं मुलगा आहे. तर चौथा क्रमांकाचा मुलगा शेख उस्मान 57 वर्षाचे आहेत. मौला साहेबांचा कुटुंब कबिला शंभरहून अधिक गोतावळ्यांचा आहे.

मौलासाब यांच्या नातवंडांनाही नातवंडं आहेत. त्यांनी एकोणिसावं, विसावं आणि एसविसावंही शतक पाहिलेलं आहे. कदाचित त्यांनी सर्वाधिकवेळा मतदान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन आपल्या वयाच्या पन्नाशीत पाहिला आहे.



मौला साहेबांचा गावातला एकमेव दोस्त म्हणजे जनार्दन वाघमारे. जनार्दनराव स्वतचं वय 87 वर्षे सांगतात. जनार्दनरावांचं वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झालं. तेव्हा मौलासाब 35 वर्षांचे होते. तर मौला साब स्वत:चं वय 127 वर्षे सांगतात.

वैद्यकीयदृष्ट्या 80 व्या वर्षापर्यंतचं वय निश्चित करता येतं. त्यानंतर वय निश्चितीसाठी खात्रीपूर्वक अशी चाचणी नाही. त्यामुळे ऐतिहासिक दाखल्याशिवाय मौलासाहेबांचं वय नेमकं किती, हे ठाम सांगता येत नाही.

1948 साली हैदराबादच्या रझाकारांविरोधात पोलिस कारवाई झाली, तेव्हा मौला साब आपलं वय 40 वर्षाचं असल्याचं सांगतात. त्या काळच्या आठवणी तसंच नेहरु सरकारबद्दच्या आठवणींचा त्यांच्याकडे खजिना आहे.

या आजोबांना 1978 साली दातांची कवळी बसवली आहे. अद्याप चष्मा लागलेला नाही. पण डोळे खराब होऊ नयेत म्हणून झिरोचा चष्मा वापरतात.

मौलाचाचा यांच्या वयाची आणि शरीराच्या घसार्याची निश्चिती करण्यासाठी अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ विजय नलगेंच्या सहकार्यांने डॉक्टरांची एक टीम तयार केली. न्युरोफिजिशिअन डॉ देवाशिष राईकर, ह्रदय रोगतज्ञ डॉ संजय शिवपुजे, रेडिओलॉजिस्ट डॉ अतुल देशमुख, आणि मूत्ररोगत्ज्ञ डॉ विश्वास कुलकर्णी यांचा ह्या टीममध्ये समावेश होता.



एका पाठोपाठ एक डॉक्टरा मौलाचाच यांच्या हृदय आणि रक्तदाबाची तपासणी करतात. हृदयाच्या सर्व झडपा नॉर्मल, कुठेही ब्लॉकेज नाही. बीपी 150-90 म्हणजे नॉर्मल. यानंतर मेंदूचा एमआर, सोनोग्राफी झाली. मेंदूचं कार्य अतिउत्तम, 50 वर्षांच्या माणसासारखा मेंदू तल्लख,  सोनोग्राफीचा रिपोर्टही बाकीचे अवयव नार्मल असल्याचा शेरा. यानंतर मेंदुची मेमरी टेस्ट झाली. या टेस्टमध्येही आजोबा पास झाले

वयोमानानं प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे. त्यासाठी ऑपरेशन केल्यावर आजोबा चालत सातव्या दिवशी ग्रामपंचायत मतदानाला गेले होते.

अलिकडे साधं राहणं खूप अवघड झालं आहे. मौलासाहेबांना मात्र ते लिलया जमलं. साधी राहणी, उच्च विचार हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं गमक आहे. फास्ट लाईफमध्ये आयुष्यही फास्ट संपतं. पण मौला साहेबांनी लाईफला फास्ट करण्याऐवजी लाईफ फिट आणि फाईन केलं आहे.