Pune News : पुण्यात अवैध दारु विक्री (liquor ) आणि अवैध दारु सेवन (Pune) करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 आणि 84 कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवली होती. एकूण 29 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती (state excise department) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे.


या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 25 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायालयाकडून या आरोपींना एकूण 37 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022  ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अशाप्रकारचे एकूण 35 गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामधील एकूण 71 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून 1 लाख 27 हजार 800 रुपये दंड करण्यात आला आहे. 


अधिक दराने मद्य विक्री करणारे  दुकान आणि देशी दारु बार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल


याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक आणि विक्रीचं संदर्भात गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव आणि मोक्काअंतर्गत 2 प्रस्ताव संबंधित  प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान आणि देशी दारु बार विक्रेत्यांवर एकूण 10 विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ


अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने वर्ष 2021-22 पेक्षा वर्ष 2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ झालेली आहे. तर अटक केलेल्या आरोपीच्या संख्येमध्ये 596 ने वाढ झालेली आहे. जप्त वाहनांच्या संख्येत 72 ने वाढ झाली असून जप्त मुद्देमालाच्या किंमतीमध्ये 5 कोटी 86 लाख40  हजार 662 रुपये इतकी वाढ झालेली आहे. 


जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र.18002339999 आणि दूरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे. शहरात गुन्हेगारी विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. कारवाईसाठी विशेष मोहीम देखील राबवण्यात आले आहेत.