मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा काल वाढदिवस झाला, या वाढदिवसाला तेजस ठाकरेंना अनोखं गिफ्ट मिळालं आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की तेजस ठाकरेंना जंगल क्षेत्रात फिरून नवनविन शोध लावण्याची आवड आहे. तेजस महाराष्ट्रासह देश विदेशातल्या जंगलात फिरून संशोधन करत असतात. कधी खेकड्यांच्या तर कधी पालीच्या प्रजातींचा शोध लावत असतात. काही दिवासांपूर्वी तेजसनं महाराष्ट्र शासनाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. तो म्हणजे, उत्तर पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून तेजसला मोठं गिफ्ट दिलं आहे. वन्यजीव संरक्षण कलम 29 आणि 35 याच्या आधारे संरक्षित क्षेत्रात काम करायचं असेल तर वन्य जीव मंडळाची मान्यता लागते. या अतंर्गत तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार, अमृत भोसले यांनी उत्तर पश्चिम घाट संराक्षित क्षेत्रामध्ये जमिनीवरील गोगल गाईचं संशोधन करण्याचा प्रस्ताव केला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. राज्य वन्यजीव मंडळाची 15वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.





खेकड्यांचा प्रजातींचा शोध 




तेजस हा आपल्यासारखा तोडफोड सेना आहे. अशा भाषेत बाळासाहेब ठाकरेंनी उल्लेख केला होता. पण आदित्य राजकारणात आल्यानंतरही तेजस अजुन राजकारणात आले नाही. कारण त्यांना राजकारणापेक्षा जंगलांमध्ये रमण्यात आवडतं. वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत.

एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे.






पालींच्या प्रजातींची शोध

खेडकड्यांच्या संशोधनानंतर तेजस ठाकरेंनी पालींच्या विविध जातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे. खेकडे, पाली आणि आता गोगलगाईंचा शोध लावण्यासाठी तेजस ठाकरे सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची एक टीम असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात आता काय शोध लागतोय यांची उत्सुकता वन्य जीव प्रेमींना आहे.





तेजस ठाकरे राजकारणात येणार? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे हे थेट राजकारणात आल्यावर तेजस ठाकरे राजकारणात कधी येणार अशी चर्चा आहे. आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरले असताना, तेजस ठाकरे हे त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसले होते. तसेच उद्धव ठाकरे जेव्हा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर होते, तेव्हा बऱ्याच वेळा तेजस ठाकरे हे मंचावर दिसले होते. त्यानंतर कधी शिवसेनेच्या शाखेत जाऊन भेटीगाठी घ्यायचे पण सध्यातरी राजकारणात येण्याचा त्याचा मानस नसल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे.