अहमदनगर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोपर्डी येथे जाऊन निर्भयाच्या आई वडिलांची भेट घेतली. निर्भयाच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा घरात येऊन आई-वडिलांची भेट घेतली. निर्भया प्रकरणाचा खटला कुठवर आला आहे याची माहिती आई-वडिलांनी संभाजीराजे यांना दिली. हा खटला जलद गतीने चालून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी संभाजीराजेंनी सरकारकडे केली आहे.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, कोपर्डीच्या भगिनीला अभिवादन करण्यासाठी मी आलोय. माझी सरकारला विनंती आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात एक अर्ज करावा आणि या खटल्यासाठी एक स्पेशल बेंच स्थापन करण्याची विनंती करावी. येत्या सहा महिन्यात हे प्रकरण निकाली काढावं. मी आई निर्भयाच्या वडिलांना भेटलो, त्यांचा खूप आक्रोश आहे. त्यांना न्याय पाहिजे. आज या प्रकरणाला चार वर्षे झाली. सरकारला माझी विनंती आहे तुम्ही उच्च न्यायालयात अर्ज करावा. या प्रकरणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. फुले शाहू यांचं आपण नाव घेतो आणि न्याय मिळत नाही, असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
2016 साली ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर 2017 साली या प्रकरणाचा निकालही लागला. प्रकरण आता उच्च न्यायालयात आहे. पण पुढची कारवाई का झाली नाही? माझी राज्य सरकारला विनंती आहे की स्पेशल बेंचच्या माध्यमातून या प्रकरणात सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयाकडे मागणी करावी, असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
कोपर्डी खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग
कोपर्डी खटल्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, खून करणे, तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 18 नोव्हेंबर 2017 रोजी दोषी ठरवत, 29 नोव्हेंबरला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. या खटल्यातील दोषी नितीन गोपीनाथ भैलूमने औरंगाबाद खंडपीठापुढील हा खटला मुंबईत वर्ग करण्याची विनंती केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी ही विनंती मान्य करत हा खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केला.