मुंबई : मंत्रीमंडळातील खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेल्या तीन तासांपासून बैठक सुरु होती. ही बैठक नुकतीच संपली आहे. ही बैठक संपवून सर्व नेते वाय. बी. सेंटरमधून बाहेर पडत आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली.


पत्रकार परिषदेमध्ये प्रफुल पटेल म्हणाले की, महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर असे ठरले आहे की, विधानसभा अध्यक्ष हे काँग्रेसचे असतील तर विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील. उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहे. सुरुवातीपासून अशी चर्चा होती की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्री मिळेल. परंतु या सर्व चर्चांना अता पूर्णविराम मिळाला आहे.

महाविकास आघाडीकडून पुढील पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीचे नेते पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद भूषवतील. विधानसभेचे अध्यक्षपद हे पुढील पाच वर्षांसाठी काँग्रेसकडेच असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या शपथ घेतील, अजित पवारांनी केलेल्या बंडाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बैठकीतून बाहेर पडलेल्या सर्व नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. अजित पवार यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहून त्यांच्या मार्ग बदलला. हे सर्व पाहून माहाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पंरतु बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन प्रफुल पटेल यांनी सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले.

बैठकीनंतर काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, तीनही पक्षांची आनंदाने चर्चा झाली. तीनही पक्ष सर्वसंमतीने उद्या राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. दरम्यान, एबीपी माझाने थोरात यांच्याशी अधिक बोलण्याचा प्रयत्न केला. उद्या किती मंत्री शपथ घेणार आहेत? मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला काय? विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत काय चर्चा झाली? याबाबत काय चर्चा झाली असे प्रश्न थोरात यांना विचारण्यात आले. परंतु प्रत्येक प्रश्नावर थोरात यांनी 'उद्या समजेल' असेच उत्तर दिले.

आलं ठाकरे सरकार पण, करेल आव्हानांचा प्रतिकार? | ABP MAJHA


शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर जोरदार तयारी | ABP MAJHA
[00:03:04]