लातूर : आईच्या चितेजवळच मुलाने स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरुरमधल्या ताजबंद शिवारात ही घटना घडली आहे. गजानन कोडलवाडे या इसमाने रविवारी रात्री त्याच्या आईच्या चितेजवळच स्वतःच्या गाडीवर डिझेल टाकले. स्वतःला गाडीमध्ये बंद केले. त्यानंतर त्याने गाडी पेटवली. त्यामुळे गजाननचा गाडीमध्ये जळून मृत्यू झाला आहे.


तीन दिवसांपूर्वी गजाननच्या आईचा मृत्यू झाला होता. काल त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवळच गजाननची स्कॉर्पिओ गाडी उभी होती. गजानने गाडीवर आणि आतमध्ये डिझेल ओतले. स्वतः गाडीत जाऊन बसला. लॉक करुन त्यांने गाडी पेटवली. गाडीसोबत गजाननही पूर्णपणे जळाला.

गजानन हा व्यवसायाने खासगी वाहन चालक आहे. त्याने दोन लग्न केली आहेत. त्याच्या घरामध्ये नेहमी कौटुंबिक कलह होत होते. त्यातच त्याच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे तो मानसिकरित्या खचला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस सध्या आत्महत्येमागची कारणे तपासत आहेत.