नागपूर : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरीची घटना घडल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ माजली आहे. नागपूरच्या धरमपेठ भागात चक्रवर्ती यांच्या घरातून सोने आणि चांदीचा ऐवज चोरी झाला आहे.


नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या चार मजली इमारतीत तिसऱ्या माळ्यावर घरगुती देवघर आहे. काल (13 जानेवारी) सकाळी नियमितपणे पूजेला येणाऱ्या पुजारीला देवघरातून काही सोने आणि चांदीचा मैलवान ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही बाब चक्रवर्ती कुटुंबियांना कळवली. कुटुंबीयांनी घरातच त्या वस्तू शोधल्या. मात्र, त्या वस्तू कुठेच न आढळल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनीही चोरीचे प्रकरण दाखल करुन घेत चोराचा शोध सुरु केला आहे. मात्र, अजूनही चोराचा पत्ता लागू शकलेला नाही.

गेल्या चार महिन्यांपासून घरात काम करणारा एक नोकर चोरीच्या घटनेनंतर बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. सध्या त्या नोकराचा शोध घेतला जात असला तरी यश मिळालेलं नाही.

नागपुरात रोज दोन-तीन घरांमध्ये चोरीच्या घटना नियमित बाब झाली आहे. अनेक वेळेला तर अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये, व्हीव्हीआयपी लोकांच्या घराजवळ राहणाऱ्या नागपूरकरांच्या घरातही चोरांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, नागपूर पोलीस चोरीच्या घटनांवर परिणामकारक नियंत्रण लावण्यात अपयशी ठरले आहे. आता थेट माजी पोलीस महासंचालकाच्या घरी चोरांनी हात साफ केल्यामुळे नागपूर पोलिसांना मान खाली घालावी लागली आहे.