पुणे : शरद पवारांच्या नावाने राज्यातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. शरद पवारांना जर भाजपसोबत जायचे असते तर ते आम्हा सर्वांना घेऊन ते गेले असते, असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आज पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.


छगन भुजबळ म्हणाले की, जर खरंच शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर त्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं असतं, आम्हाला सोबत घेऊन ते भाजपमध्ये गेले असते. त्यांच्या मनात तसेच काहीच नव्हते. पवार साहेबांनी सुरवातीपासून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जायचे ठरवले होते.

भुजबळ म्हणाले की, निवडणुकीत काँग्रेस आमचा सहयोगी पक्ष होता, त्यामुळे आम्ही आधी त्यांना विश्वासात घेतले आणि नंतर शिवसेनेसोबत चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन वेळा दिल्लीतही चर्चा झाली. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला. तिघांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापन केली.

भुजबळांनी सांगितले की, शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याबद्दल त्यांनी ठरवलं असतं तर त्यांना कोणी अडवलंदेखील नसतं.

दरम्यान मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत भुजबळ यांना विचारण्यात आले. यावर भुजबळ म्हणाले की, मंत्रीमंडळाचा विस्तार हा पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्याचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे.