सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी या सरकारवर टीका करत हे सरकार टिकणार नसल्याचा दावा केला आहे. यात आता भाजप खासदार नारायण राणे यांची भर पडली आहे. राज्यात झालेले बदल आणि त्यामुळे कोकणाच्या विकासावर झालेला परिणाम यावर बोलण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी सरकारवर टीका करत सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा केला. राणे यावेळी म्हणाले की, 28 नोव्हेंबरला सरकार स्थापन झालं आहे. आज 8 डिसेंबर असून आजवर त्यांचे मंत्री आणि खाती ठरली नाहीत. या सरकारला मी एक नाव दिलं ते म्हणजे स्थगिती सरकार. या सरकारने अनेक चांगल्या विकास कामांना स्थगिती दिली त्यामुळे विकास ठप्प झाला आहे, असेही राणे म्हणाले. चांगल्या कामांना स्थगिती द्यायची आणि ठेकेदारांना बोलवायचं त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, असा आरोपही त्यांनी केला.


राणे म्हणाले की, कोकणातली विकास काम ठप्प झाली आहेत आणि त्याला पूर्णपणे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. हे शेतकरी, व्यवसाय यांच्या भल्यासाठी एकत्र आलेले नसून फक्त स्वत:च्या हितासाठी एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले.

काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथल्या खासदारांनी आढावा बैठका घेतल्या. खासदार अशा बैठका कोणत्या अधिकाराखाली घेतो. सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना कोणत्या अधिकारात आदेश देऊ शकतो. त्यामुळे बेकायदेशीररित्या बैठका घेऊन आम्ही काही तरी करतोय हे सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. ही जनतेची फसवणूक आहे, असे ते म्हणाले.

येणाऱ्या 15 ते 18 ऑक्टेबरला आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुक्यात गाव भेटी घेणार आहोत. या भेटीदरम्यान जनतेला या निवडणुकीमध्ये भाजप सरकार स्थापन का करू शकलं नाही? तीन पक्षाचं सरकार राज्याला पोषक नाही या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. या सरकारने ज्या विकास कामाला स्थगिती दिली आहे. त्या विरोधात आवाज उठवला जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यावर आरोप केला. ते सांगतात ती एकही गोष्ट खरी नसते. ते थापाडे आमदार आहेत, असं एकेरी उल्लेख करत आरोप केला. गेल्या 10 दिवसात खाते वाटप करू शकले नाहीत. ज्या माणसाला प्रशासनाची एबीसीडी माहिती नाही त्याच्याकडून काय अपेक्षा आहे. महाराष्ट्रातचं काय होणार याची आम्हाला चिंता आहे, असेही राणे म्हणाले.