मुंबई : कोरोनातून बरे झाल्यानंतर आता अधिकची खबरदारी बाळगणं आवश्यक झाले आहे. कोरोनातून बरे झालेल्या निवडक रुग्णांमध्ये नव्या प्रकारचे साइड इफेक्ट जाणवत आहेत. ‘म्युकोरोमायकॉसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रुग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे.


काय आहे हा बुरशीजन्य संसर्ग?


कोविडनंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बऱ्या झालेल्या कोविड रुग्णांमध्ये  हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे.  कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. याचा मृत्यूदर हा 54 टक्के असून, वेळेवर उपचार घेतल्यास आजारातून बाहेर पडता येते. 
कोरोनानंतर कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे नाकामध्ये या बुरशीची वाढ होऊ शकते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदूकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्यास इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार करता येतात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पाच ते सात दिवसांत किंवा महिन्याभरानंतरही ही लक्षणे दिसू शकतात. 


काय आहे  ‘म्युकोरमायकॉसिस’?


कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जिवाणू नाकामध्ये जातात. परंतु, रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते. कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.


म्युकोरोमायकॉसिस घातक का आहे?



  • या बुरशीचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आणि उपचारासाठी वेळ कमी मिळतो.

  • लवकर निदान झाले तर इंजेक्शनद्वारे उपचार शक्य

  • जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ

  • डोळ्यांपाशी संसर्ग पोचल्यास त्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता

  • मेंदूपर्यंत संसर्ग पोचल्यास उपचार करणे दुरापास्त होते.


या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणे दुर्लक्षित केली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोविडमधून बरे झालेल्यांनीही  प्रत्येक लक्षणाकडे  बारकाईनं पाहिलं पाहिजे


म्युकोरोमायकॉसिसची लक्षणे



  • चेहऱ्यावर सूज येणे

  • गाल दुखणे

  • डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे

  • डोके दुखणे, नाक चोंदणे

  • रक्ताळ किंवा काळसर जखम


 या आजाराची लागणच होऊ नये यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं आवश्यक आहे.तसंच, कोणतीही लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांना दाखवणंही गरजेचं आहे.


काय काळजी घ्यायची?



  • रोगप्रतिकारशक्ती संतुलित होईल यासाठी प्रयत्न करणे

  • संबंधित लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा

  • म्युकोरोमायकॉसिस या बुरशीच्या प्रसाराचा वेग जास्त आहे, त्यामुळे उपचारासाठी टाळाटाळ करू नका

  • रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करा, रक्तदाब नियंत्रित करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या


कोणी घ्यावी विशेष काळजी



  • मधुमेह असणाऱ्यांनी

  • उच्च रक्तदाब असलेल्यांनी

  • कीटोॲसिडॉसिस

  • रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले