Manoj jarange patil : आज लोकसभेच्या निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये किती टप्प्यात, कोणत्या तारखेला मतदान होणार याबाबतची माहिती मिळणार आहे. दरम्यान, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा,सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मग निवडणुका जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
सत्ताधारांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही
निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार पण त्या आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. सगेसोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नका असे जरांगे पाटील म्हणालेत. सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमची भूमिका मांडणार असल्याचे पाटील म्हणाले. सत्ताधारांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत आहे. त्यामुळं त्यांना सत्ताच मिळू देणार नाही, मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
900 एकरमध्ये 6 कोटी समाज बांधवांची सभा घेणार
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता आचारसंहिता लागू केली तर मराठा समाजाची सभा घेणार आहे. निवडणूक लागतच सभेची तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 900 एकरमध्ये 6 कोटी समाज बांधवांची सभा घेणार आहे. मुबंई, पुण्यासह अमरावती सोलापूर, बीड, उस्मानाबाद आशा 11 ठिकाणच्या जागांचा पर्याय आहे. यापैकी एक जागा अंतिम करणार
असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.
आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारनं सगेसोयरेची अंमलबजावणी करावी
आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारनं सगेसोयरेच्या अंमलबजावणीची घोषणा करावी, अन्यथा निवडणूक पुढे ढकलावी असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असताना सरकार आचारसंहिता कशी लावणार? असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला केला. मराठा समाजाला डावलून, त्यांचा अवमान करुन सरकारनं आचारसंहिता लागू करु नये असे जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समाजावर अन्याय करणार नाही याची आशा आहे. ओबीसीमधून सरकारनं आरक्षण दिलं तर मराठा समाज सत्ताधाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचणार, अन्यथा सत्ता मिळू देणार नाही असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाच्या आंदोलनाचे लोन देशभर पसरणार
मराठा समाजाच्या आंदोलनाचे लोन देशभर पसरणार आहे. प्रत्येक गावातून 10 उमेदवार निवडणुकचा अर्ज भरणार आहेत. गुजरात, हरियाणामध्येही मराठा समाजाच्या आंदोलनाचा फॉर्म्युला राबवण्यात येणार आहे. मी कोणाचा प्रचार करणार नाही, मी जनेतीची भावना मांडतो, शरद पवार उद्धव ठाकरेंची भाषा बोलत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी 30 दिवसाच वेळ मागितला होता, ठराव करणार होते, तो ठराव आता बाहेर पडेल. मराठा आंदोलन दरम्यान झालेल्या घडामोडीची चौकशी करण्यासाठी SIT लावण्याची आता गरज काय? फडणवीस आधी नाही म्हटले होते, आता SIT का लावत आहेत. निवडणूक सुरु झाली तर सगळे पत्ते बाहेर पडणार आता सरकार पुढच्या अडचणी वाढतील असेही जरांगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय थांबणार नाही, भाजपचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा