Suryagrahan 2022 : सूर्यग्रहण (Surya grahan 2022) किंवा चंद्रग्रहण हा निसर्गाचा एक विलोभनीय आविष्कार आहे. तो सावल्यांचा खेळ आहे. प्रत्येकाने तो पाहायला हवा. त्याचा आनंद घ्यायला हवा. मात्र, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्म्यातूनच ते पाहावे किंवा पुढीलप्रमाणे विज्ञानाचा एक साधा प्रयोग करून, सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी न पाहताही, घरच्याघरी सूर्यग्रहण आपल्याला पाहता येईल.
25 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण आहे. आज दिवाळी साजरी होणार असून दिवाळीच्या रात्रीपासून च सुर्यग्रहणाचे वेध लागणार आहे. 2022 मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. ग्रहण, ही एक नैसर्गिक घटना आहे. सूर्यग्रहणामध्ये, सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र आला की, चंद्राची सावली पृथ्वीच्या ज्या भागावर पडते, तेथे सूर्यग्रहण लागले असे म्हणतात. या काळात कोणतीही धोकेदायक किरणे निर्माण होत नाहीत. त्यामुळे वातावरणात किंवा सजीवांच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. साहजिकच ग्रहणकाळाचा आणि अन्नपाणी दूषित होण्याचा काहीएक संबंध नाही.
अनेकदा ग्रहणांबाबत कुठल्यातरी थोतांडांचा, मंत्र-तंत्रांचा, पुराणातील काल्पनिक कथांचा पुरावा असल्याचे सांगून, अंधश्रद्धा पसरविल्या जातात. ग्रहण पिडादायक असते. 'ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवू नये. भोजन करू नये. पाणी पिऊ नये, शिजवलेले अन्न आणि साठवलेले पाणी ग्रहण काळ संपल्यानंतर फेकून द्यावे. गर्भवती महिलांनी या काळामध्ये भाजी चिरू नये, फळ कापू नये. अन्यथा जन्माला येणाऱ्या बाळामध्ये व्यंग निर्माण होते', अशा भीतीदायक आणि अवैज्ञानिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे समाजामध्ये ग्रहणांबद्दल अंधश्रद्धा पसरण्याचा प्रचंड धोका निर्माण होतो.
म्हणून उद्याचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता, वरील प्रमाणे साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पहावे आणि ग्रहणांबद्दलच्या अंधश्रद्धा हद्दपार कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसतर्फे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे आणि राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलेले आहे.
असे पाहता येईल घरच्या घरी सूर्यग्रहण
एक बाय एक फूट आकाराचा पुठ्ठा घेऊन त्याला मध्यभागी एक इंच त्रिजेचे वर्तुळाकार छिद्र पाडावे. भिंत किंवा पडदा आणि दुसऱ्या बाजूला एक छोटा सपाट आरसा यामध्ये छिद्र पाडलेला पुठ्ठा धरावा. सूर्यग्रहण काळामध्ये सूर्याचे प्रतिबिंब सपाट आरशात पडून ते परावर्तित होऊन , पुठ्ठ्याच्या छिद्रातून भिंतीवर किंवा पडद्यावर पडेल, अशी योजना करावी. सूर्यग्रहण लागल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत आपल्याला सूर्याकडे न पाहताही, सूर्यग्रहणाचे अवलोकन करता येईल. त्याचा आनंद घेता येईल.