सोलापूर : 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन डे' नाही, तर 'शहीद दिन' म्हणून साजरा करावा, असं परिपत्रक सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं. मात्र टायपिंगची चूक असल्याचं सांगत हे परिपत्रक पुन्हा रद्दही करण्यात आलं.

14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा न करता शहीद दिन साजरा करावा, असे मेसेज दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे मेसेज पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं असल्याचं बोललं जात आहे.

14 फेब्रुवारी रोजी शहीद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं. त्यामुळे सर्व शाळांमध्ये या क्रांतीविरांच्या प्रतिमांचं पूजन करावं. शिवाय सर्व विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना आमंत्रित करावं आणि शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत देण्याचं त्यांना आवाहन करावं, असं परिपत्रक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं होतं.



भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. मग आपण 14 फेब्रुवारीला शहीद दिन का साजरा करत आहोत, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. मात्र काही स्वातंत्र्य सैनिकांना 14 फेब्रुवारीलाही फाशी देण्यात आली होती, असं उत्तर मिळालं.

मराठी टायपिंग चुकीमुळे 14 फेब्रुवारी अशी तारीख करण्यात आली, असं शिक्षणाधिकाऱ्यांकडून अखेर पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आलं.



दरम्यान हे परिपत्रक काढण्यात जिल्हा परिषदेची आणि शिक्षण विभागाची चूक आहे, असा आरोप समाजसेवकांनी केला आहे. तर असं परिपत्रक काढण्याचा अधिकार केवळ शासनाला असून अधिकारी परिपत्रक काढू शकत नाहीत. त्यामुळे सोलापूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेलं परिपत्रक रद्द करण्यात आलं असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.