ठाणे : सफाई कामगरांची मतदान केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रप्रमुख म्हणून भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जवळपास 70 कामगारांना प्रशिक्षणाची नोटीस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आम्हाला निवडणुकीचं काम माहिती नाही, आमची नियुक्ती रद्द करा, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

ठाण्यासह 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात येते. ती आयुक्तांकडे देऊन संबंधितांची नियुक्ती केली जाते.

भिवंडी महापालिकेचे आस्थापना प्रमुख नितीन पाटील यांनी पालिकेतील स्मशानभूमी, साफसफाई बगीचा, शिपाई अशा चतुर्थ श्रेणीतील 70 कामगारांच्या नावांची यादी परस्पर ठाणे महापालिका आयुक्तांना पाठवली.

या कामगारांना वर्ग 1 आणि 2 चे अधिकारी असल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र प्रमुख आणि मतदान अधिकारी या पदांवर नियुक्त केलं. त्या आदेशांमुळे सफाई कामगारांना मात्र जबाबदारीचं काम लक्षात आल्यानं त्यांनी या कामाला विरोध केला आहे.

यादीनुसार निवडणूक प्रशिक्षणासाठी हजर राहण्याच्या लेखी सूचना आल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी ठाणे आणि भिवंडी पालिकेच्या अधिकारी वर्गाकडे अर्ज केले आहेत. मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नाही, असा आरोप कर्मचारी करत आहेत. त्यामुळे निवडणूक कामात ऐनवेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.