बुलडाणा : राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडत आहे. यातच बुलडाण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत एक वेगळाच किस्सा घडला. मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपस्थित असलेल्या एका मुलीने चक्क स्टेजवर जाऊन भाषण करण्याचा हट्ट धरला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी नेमकं काय घडलं?
बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु होतं. यावेळी समोर शेकडोंची उपस्थिती होती. यात एक मुलगी होती. ती अत्यंत मन लावून मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत होती. भाषण सुरु असतानाच ती उठली आणि स्टेजकडे जाऊ लागली.
मुलगी स्टेजकडे जातेय, हे पाहिल्यावर सुरक्षारक्षक सतर्क झाले. सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला गराडा घातला आणि तिथून बाजूला घेऊन गेले.
दीपाली सुभाष सावळे असे त्या मुलीचे नाव असून, ती बुलडाणा जिल्ह्यातील डोगर खंडाळा येथील राहणारी आहे. शेतकरी कुटुंबातील असलेली दीपाली मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने प्रभावित झाली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवरुन भाषण करण्याची तिची इच्छा होती.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी दीपालीला समजावलं आणि तिच्या वडिलांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार अगदी काही मिनिटांचा होता. मात्र, दीपालीचा भाषण करण्याचा आणि तोही मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवरुन भाषण करण्याचा हट्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा होता.