सोलापूर : सांडपाण्याच्या नावाखाली उजनी मधील 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अशात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची दोन विधाने या पाणीचोरीला पुष्टी देणारी समोर आल्याने आता भरणे मामा सोलापूर जिल्ह्याला मामा तर बनवत नाहीत ना असे म्हणायची वेळ आली आहे. मात्र, उजनीतील पाण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आता हा निर्णय रद्द न झाल्यास उजनी धरणात महाराष्ट्र दिनादिवशी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूकडून येणारे 5 टीएमसी सांडपाणी उचलून ते इंदापूरला देण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काढला आणि दुष्काळी सोलापूर जिल्ह्यावर बॉम्ब पडला. यातून सोलापूर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यावर तातडीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण सोलापूरच्या हक्काचे एक थेंबही पाणी नेणार नसून तसे झाल्यास राजकीय सन्यास घेऊ अशी घोषणा केली आहे.
उजनी पाणी पुन्हा पेटणार; हा तर बारामती लोकसभा स्थिरीकरणासाठी डाव , खा. रणजित निंबाळकर यांनी साधला निशाणा
मात्र, याच भरणे मामा यांची इंदापूरमध्ये बोललेली एक क्लिप सोलापूर जिल्ह्यात व्हायरल झाल्याने मामा सोलापूर जिल्ह्याला मामा बनवत असल्याचे दिसून आले. सोलापुरात पाणी नेणार नसल्याची भाषा करणारे मामा इंदापूरमध्ये जाताच ये तो अभी ट्रेलर है असे म्हणत उजनीचे पाणी कसे न्यायाचे याचा आराखडा सांगू लागतात.
या सर्व प्रकारानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी काल कुर्डू येथे बैठक घेत याला तीव्र विरोध करण्यासाठी महाराष्ट्रदिनी उजनी धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा या शेतकरी नेत्यांनी दिला आहे. यावर न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा माढा खासदार रणजित निंबाळकर यांनी देताना हे सर्व बारामती लोकसभा सेफ करण्यासाठी पवार कुटुंबाची धडपड सुरु असल्याचा आरोप केला आहे. हा पाणीचोरीचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नसून नीरा देवधरचे पाणी असो अथवा उजनीतून 5 टीएमसी पाणी असो याला रस्त्यावर व न्यायालयात लढा उभारण्याचा इशारा निंबाळकर यांनी दिला आहे.