सोलापूर : सरकारी शाळेतील शिक्षकांसाठीचा ब्लेझर सक्तीचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेने मागे घेतला आहे. तीन महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना ब्लेझरची सक्तीचे आदेश दिले होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या दबावामुळे हा ब्लेझर सक्तीचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासन पदाधिकाऱ्यांवर आली आहे.


सोलापूर जिल्हा परिषदेने 19 नोव्हेंबरपासून ब्लेझर घालून शाळेत येण्याचे आदेश शिक्षकांना दिले होते. यावरुन शिक्षक संघटना आणि जिल्हा परिषद आमनेसामने उभे ठाकले होते. ब्लेझर ऐवजी जॅकेट देण्याचा पर्याय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांनी सुचवला होता.


मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नास तयार असताना आणि गणवेश घालण्यास सर्वानुमते संमती दिली असताना हा ब्लेझरचा अट्टाहास का असा सवाल शिक्षक संघटनांनी केला होता.


शिक्षकांवर दबाव आणण्यासाठी जिल्हाभरातील शाळांची तपासणी करण्यासाठी पथके पाठवण्यात आली होती. मात्र या पथकाचा दबाव शिक्षकांनी झुगारून देत केवळ गणवेश परिधान करुन ब्लेझर शिवाय शाळेत हजेरी लावली.


संबंधित बातम्या


जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुजी सुटबुटात