अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला आहे. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18, भाजपच्या 14, बसपाच्या 4 आणि एक अपक्ष अशा 37  नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमही यावेळी सभागृहात उपस्थिती होता. छिंदम नेमकं कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.


छिंदमने मी शिवसेनेला मतदान करणार असं जाहीर केलं. मात्र शिवसेनेने छिंदमचं मत नाकारलं. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी श्रीपाद छिंदमला मारहाणही केली. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत छिंदमला बाजूला नेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


राष्ट्रवादीची दुतोंडी भूमिका


अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे आदेश असतानाही नगरसेवकांनी भाजपला मत का दिलं? याची चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नगरसेवकांकडून खुलासा मागितला असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे आधी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा आणि मग कारवाईचा इशारा अशी दुतोंडी भूमिका राष्ट्रवादी बजावत आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.


अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. महापालिका निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला तरी शिवसेनेला अहमदनगर महापालिकेत सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा गोवा पॅटर्नची पुनरावृत्ती झाली.


अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 24 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ भाजपने 14, काँग्रेसने 05, राष्ट्रवादीने 18 आणि बसपाने 04 जागा जिंकल्या. समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.


संबंधित बातम्या


अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी


शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी