सांगली : आईने आपल्या एक महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातील आसंगीमध्ये समोर आली आहे. त्यानंतर आईने विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्नही केला, मात्र विहिरीत पाणी नसल्याने महिलेचा प्रयत्न फसला. या प्रकरणी महिलेवर मुलाचा खुनाचा आणि आत्महत्याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


सांगलीतील संगीता भानुदास गडदे या 22 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महतेचा प्रयत्न केला. तर विहिरीच्या काठावर बाळाचा मृतदेह आढळल्याने सुरवातीला बाळाचा भुकेने रडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र रात्री पोलीस तपासात संगीताने आपल्या बाळाला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार केल्याचं उघडकीस आलं.


संगीताचा अडीच वर्षांपूर्वी भानुदास गडदेसोबत विवाह झाला होता. दरम्यान संगीताला गंभीर आजार झाला. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये वाद निर्माण झाले होते. नवऱ्याने संगीताला गंभीर आजार असल्याने माहेरी पाठवले होते. मात्र माहेराहून परतल्यावर पती भानुदासकडून पत्नीला पुन्हा आजाराचे कारण देत वाद घातला.


काल रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास संगीता आपल्या बाळासह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने बाहेर पडली. प्रथम संगीताने बादलीत आपल्या बाळाला बुडवून मारले. त्यानंतर गावाशेजारी असलेल्या एका शेतातील विहिरीच्या काठावर बाळाला ठेवून तिने विहिरीत उडी घेतली.


मात्र विहिरीत फार पाणी नसल्याने संगीताचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि त्या विहिरीतच ती सकाळपर्यंत उभी राहिली. दरम्यान शेतमालकाचा मुलगा विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी आला त्यावेळी त्याला मृतअवस्थेत असलेलं बाळ दिसलं. विहिरीत डोकावून पाहिलं असता संगीता पाईपला धरुन उभी असल्याचं दिसलं. गावातील लोकांच्या मदतीने संगीताला बाहेर काढून उपचारासाठी मिरज येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले.


पोलीस तपासात आपल्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडवून मारल्याचं संगीताने सांगितलं. बाळाच्या खुनाचा आणि आत्महत्या करण्याचा गुन्ह्याप्रकरणी संगीतावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.