Kiran Lohar : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारला (Kiran Lohar) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजार रुपयांची लाच घेताना (bribe) रंगेहाथ अटक केलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लोहार यांच्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान शिक्षण उपसंचालक यांच्याकडून प्राथमिक अहवाल तातडीने पाठविण्यात यावा असे कळवण्यात आले होते, त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक अहवाल शिक्षण उपसंचालक यांच्याकडे 1 नोव्हेंबर रोजी पाठवला होता.
3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालानुसार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तातडीने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालक पुणे व शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग केल्याने त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) मधिल नियम 4 नुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल पाठविण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी हे वर्ग एकचे अधिकारी असून त्यांचे नियुक्ती प्राधिकारी राज्य शासन आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी या नात्याने राज्य शासनास आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल प्राप्त होताच तातडीने पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनास पाठविला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
प्रहार संघटनेचा सीईओंवर आरोप
किरण लोहार याच्या निलंबनाच्या कारवाईत दिरंगाई केली जात असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. या संघटनेते थेट सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी दिलीप स्वामींवर हा आरोप केला आहे. अशा प्रकरणात कारवाईचे अधिकार हे शिक्षण आयुक्तांना असताना त्यांनी उपसंचालकाकडे प्रस्ताव पाठवला. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना कारवाईची प्रक्रिया माहित नाही का? असा सवाल प्रहार संघटनेने उपस्थित केला आहे. लाचखोर शिक्षणाधिकारी यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची तसेच दिलीप स्वामी यांची ही चौकशी करा, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.
किरण लोहारच्या रत्नागिरीतील कामाचीही चौकशी करण्याची मागणी
किरण लोहार रत्नागिरीमध्ये शिक्षणाधिकारी असताना त्यांनी दिलेल्या बेकायदेशीर शिक्षक मान्यतेविषयी 2016 पासून शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार रत्नागिरीचे आत्माराम मेस्त्री करत आहे. मेस्त्री यांनी बच्चू कडू मंत्री असताना त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं. त्यांनी सप्टेंबर 2011 मध्ये आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानुसार लोहारची चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. सुमारे सहा महिने पाठपुरावा केल्यावर मार्च 2022 मध्ये आयुक्तांनी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांना लोहारची चौकशी करण्याचंं सांगितलं होतं. आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशी करण्याविषयी सुमारे तीन महिने उपसंचालकांशी पत्रव्यवहार केला. मात्र उपसंचालक दाद देत नव्हते. शेवटी 15 ऑगस्ट 2022 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यावर 28 जुलैला चौकशीसाठी मला बोलावण्यात आलं होतं. मात्र चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यासाठी गेली तीन महिने पत्रव्यवहार करत आहे. मात्र शिक्षण आयुक्त किंवा उपसंचालक दाद देत नाहीत. लोहारच्या या प्रकरणाचा गेली सहा वर्षे पाठपुरावा करत आहे. पण शासन स्तरावरुन लोहार यांना पाठबळ असावं, अशी शंका रत्नागिरीच्या आत्माराम मेस्त्री व्यक्त केली आहे.
ही बातमी देखील वाचा