Solapur Unlock : सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा देण्यात आला आहे. या पाच तालुक्यांत आजपासून कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोल्यातील निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. आठवड्यातील पाच दिवस सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानंही सातही दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


कोरोनाचं संकट असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना आजपासून प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून सर्व दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आजपासून प्रशासनाने या संचारबंदीत शिथिलता दिल्याने दुपारी चारपर्यंत सर्व दुकानं सुरु राहणार आहेत. प्रशासनाच्या या आदेशानुसार, सर्व दुकानं आठवड्यातील पाच दिवस सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवांची दुकानं संपूर्ण सात दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 


सोलापुरातील या पाच तालुक्यांत लग्नासाठी 50 जणांना तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. सर्व हॉटेल आणि रेस्टारंट 50 टक्के उपस्थितीत पाच दिवस सुरु ठेवता येणार आहे. तसेच, सर्व खाजगी कार्यालयं उघडण्यासही परवानगी दिली आहे. सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांना 50 टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक आणि सलून स्पा यालाही आठवड्यांतील पाच दिवस परवानगी दिली आहे. 


दरम्यान, पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील पाच तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :