रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण कारखाना होण्याबाबतच्या घडामोडी कायम आहेत. मुख्य बाब म्हणजे रिफायनरी समर्थक शिवसेना खासदार विनायक राऊत यांची भेट घेण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. पण, खासदारांकडून वेळ मिळत नव्हती. परिणामी आम्ही जायचं कुठं? कुणाशी चर्चा करायची? असा प्रश्न त्यांना पडला होता. याबाबत वेळोवेळो रिफायनरी समर्थकांकडून आपलं म्हणणं देखील मांडलं जात होतं. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून खासदार विनायक राऊत यांनी समर्थकांना भेट दिली असून त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं आहे. 


राजापूरमधील रेस्ट हाऊसमध्ये शनिवारी संध्याकाळी 8 वाजता याबाबतची भेट झाली आहे. यावेळी राऊत यांनी तुमचं म्हणणं मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल असं आश्वासन दिलं आहे. शिवाय, या महिन्याच्य अखेरीस खासदार विनायक राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत माहिती देणार असल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे रिफायनरी समर्थकांच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या भेटीकरता सर्व सामान्य, वकील, शेतकरी, आंबा बागायतदार देखील हजर होते. अद्याप तरी या प्रकल्पाचं भवितव्य अधांतरी आहे. पण, खासदारांच्या भेटीनंतर रिफायनरी समर्थक मात्र पुन्हा एकदा आशावादी झाले आहेत. 


खासदारांच्या भेटीत कोणता मुद्दा चर्चिला गेला?


खासदार विनायक राऊत यांच्याभेटीत वाढतं समर्थन, रोजगार आणि कोरोनानंतर ओढावलेली परिस्थिती आणि प्रकल्प झाल्यास होणारा फायदा यावर प्रामुख्य़ानं चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव इथं प्रकल्प करावा अशी मागणी आहे. तरी ठिकाणी विरोध कमी असून या साऱ्यांचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी आणि चर्चा देखील केली गेली आहे. 


शिवसेना तयार होईल?


सध्या या ठिकाणी केवळ शिवसेनेचाच विरोध आहे. स्थानिकांशी आम्ही सोबत आहोत असं म्हणत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण, एकंदरीत सारी परिस्थिती पाहता सर्वपक्षीय नेते याकरता सध्या सकारात्मक होताना दिसत आहेत. 


...तर, शिवसेनेला मोठी किंमत चुकवावी लागेल


प्रकल्प रद्द हा शिवसेनेनं दिलेला शब्द. पण, अशावेळी काही प्रमाणात का असेना समर्थन वाढत आहे. त्यात शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील याठिकाणी मोठा आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या भागाची, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. अशा स्थितीत शिवसेनेला साऱ्या गोष्टींचा अंदाज घेत प्रकल्पासंदर्भात पावलं उचलावी लागणार आहेत.