सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठातर्फे ऑनलाइन परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्याची सुरुवात कालपासून झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनातकडे निवेदन देखील दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी देखील तांत्रिक अडचण यांची समस्या कायम राहिली.
सकाळी अकरा वाजताची वेळ असताना सर्व्हर डाऊन असल्या कारणाने चार वाजता लॉगिन करण्यात यावेत अशी सूचना वेबसाइटवर दिसत होती. मात्र चार वाजल्यानंतर देखील तीच समस्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तांत्रिक अडचणीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होत होती. वायरस अटॅक झाल्याने विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेबसाईचे सर्व्हर क्रॅश झाले. त्यामुळे आज नियोजित एकही ऑनलाईन परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तर उद्या आणि परवा (7 आणि 8 ऑक्टोबर) रोजीच्या परीक्षा देखील तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी ज्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होत्या त्या सर्व परीक्षा 21, 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. तर एकाच वेळी सर्व्हरवर लोड येत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रम (इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर) परीक्षांची वेळ बदलण्यात आली आहे. सकाळी 11.30 ते 4.30 ऐवजी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. तर 9 ऑक्टोबरपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा या पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रेणीक शाह यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी
- व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाला, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लॉगीन करता आले नाही.
- वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक असल्याने पेज ओपन होत नव्हते.
- लॉगीन झाल्यानंतर परीक्षेची वेळ सुरु झाल्यानंतरही प्रश्नपत्रिका दिसत नव्हती.
- परीक्षा सुरु असताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पेज हँग झालं, काऊंडाऊन मात्र सुरुच राहीलं
- वेबसाईटवर वारंवार एरर येत होते. रिफ्रेश केल्यास परिक्षा संपल्याचा मेसेज दिसत होता.
- विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या हेल्पलाईनमधील नंबर लागत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
- ऑनलाईन परीक्षांच्या गोंधळावरुन एनएसयुआय आक्रमक
ऑनलाईन परीक्षा देताना येणाऱ्या अडचणींमुळे एटीकेटी आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावेत, या मागणीसाठी एनएसयुआयतर्फे निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते दुपारी विद्यार्थी विद्यापीठात पोहोचले. मात्र यावेळी परीक्षा विभागाचे संचलाक हे कार्यालयात नसल्याने संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयाला कुलूप लावलं. तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे, याला सर्वस्वी जबाबदार कुलगुरू असून राज्यपाल देखील यामध्ये हस्तक्षेप करत नसल्याची टीका एनएसयुआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी यावेळी केली.
संबंधित बातम्या :
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी
#FinalYearExam मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेत तांत्रिक अडचणी, कलिनामध्ये विद्यार्थी-पालकांचा जोरदार गोंधळ