सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. कोरोनामुळे देशभऱात लॉकडाऊन करण्यात आलं. सर्व काही बंद झालं, यामध्ये शिक्षणसंस्था देखील बंद करण्यात आल्या. ऐन परीक्षांच्या काळात लॉकडाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले होते. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच कोरोनाचा संसर्ग देखील वाढू नये यासाठी विद्यापीठांतर्फे ऑनलाईन परीक्षांचे नियोजन करण्यात आले. सोलापुरात आज एटीकेटी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली.


मात्र पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक समस्यांना सामोरं जावं लागण्याने मनस्ताप सहन करावा लागला. मात्र त्यावर तात्काळ उपाय म्हणून विद्यापीठातर्फे वेळ देखील वाढवून देण्यात आला. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांसाठी 50 एमसीक्यू प्रश्न देण्यात आले होते, ज्यासाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर परीक्षेचा वेळ सुरु झाला. मात्र स्क्रीनवर विद्यार्थ्यांना प्रश्न दिसतच नव्हते. अनेक विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनच्या समस्येला देखील सामोरं जावं लागलं. त्यामुळे परीक्षा सोडवताना मनस्ताप झाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं तर परीक्षांचा निकाल काय येईल याची देखील चिंता असल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना विद्यार्थ्यांनी दिली.


तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थी संघटनांची मागणी


विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत तांत्रिक अडचणी आल्यास संपर्क करण्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आले होते. मात्र एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांचे फोन सतत सुरु असल्याने हेल्पलाईन सातत्याने व्यस्त दाखवत होती. आनलाईन परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनामार्फत करण्यात येत आहे. प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने याबाबत कुलगुरुंना निवेदन देण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनात नापास होण्याची भीती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांना कुलगुरु कशापद्धतीने न्याय देणार हा आमच्या मनात प्रश्न असल्याची भावना एनएसयूआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी व्यक्त केली तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निशांत सावळे यांनी देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी, अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.


एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही - परीक्षा संचालक


दरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठातर्फे तात्काळ कार्य़वाही करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला. 70 टक्के विद्यार्थ्यांच्या परीक्षा या अत्यंत सुरळीत पार पडल्या आहेत. परीक्षेच्या दरम्यान काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होऊन अडचणी निर्माण झाल्या. त्यासाठी परीक्षा होईपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीतपणे पार पडेल. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. अशी प्रतक्रिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांकडून देण्यात आली.


गरजू विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी युवती आणि विद्यार्थी काँग्रेसतर्फे मोबाईल उपलब्ध


राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी मोबाईल उपलब्ध करुन दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरवले परंतु काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही. विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षांचा पर्याय देखील दिला होता, मात्र ऐन वेळेस विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये तसेच कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्टफोन उपलब्ध करुन दिले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निशांत सावळे आणि युवती अध्यक्ष आरती हुळ्ळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली.