सोलापूर : पैशांची भिशी सामान्यपणे कशी चालते हे तुम्ही-आम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे. दरमहा चालणारा भिशीचा व्यवहार सर्वश्रुत आहे. पण झाडांचीही भिशी असू शकते, याची तुम्हाला कल्पना आहे का?
हिरवा परिसर जीवन नवे
एक तरी झाड लावायला हवे...
असा संदेश देणारी भिंतीचित्रं आपल्याला सर्रास पहायला मिळतात, मात्र त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. सोलापुरतील काही डॉक्टर्स मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी चक्क झाडांची भिशी सुरु केली आहे.
नुसती झाडं लावून उपयोग नाही. ती स्वतः रुजतीलही, पण त्यांची काळजी घ्यायला नको का? तुमच्या-आमच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी हे वेगळं कशाला सांगायला हवं? ही भिशी तुम्हाला आर्थिक सुबत्ता देणार नाही. ती तुम्हाला क्षणिक सुखाचा आनंद देणार नाही, तर ही भिशी देईल तुम्हाला आयुष्यभराची सावली.