नागपूर: हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टनने गळफास घेऊन आत्महत्या केली. मानिम एस जयसिम्हा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. जयसिम्हा यांनी नागपुरात राहत्या घरी आत्महत्या केली.

 

जयसिम्हा हे नागपूरच्या सोनेगाव एयरफोर्स स्टेशनवर ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत होते.

 

जयसिम्हा हे फ्रेंड्स कॉलनी परिसरात पत्नी आणि मुलीसह एका अपार्टमेंटमध्ये राहत होते.  काल संध्याकाळी बराच वेळ त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता, जयसिम्हा गळफास लावलेल्या अवस्थेत होते.

 

त्यांना तातडीने सैन्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

 

दरम्यान, गिट्टीखदान पोलीस स्थानकात रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरु करण्यात आला आहे. पोस्टमार्टमच्या अहवालातून मृत्यूचं मूळ कारण कळू शकेल असं पोलिसांचं म्हणणं आहे.