Solapur Sugarcane Price News : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. काही कारखान्यांची 1 ते 2 लाख टन ऊसाचे गाळपही केलं आहे. तरी देखील अद्याप कोणत्याही साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. याच पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र आले आहेत. ऊसदर संघर्ष समिती सोलापूर जिल्हा या छत्राखाली पंढरपुर तालुक्यातील गादेगावमध्ये ऊस परिषद घेण्यात आली. यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. 21 तारखेपर्यंत ऊसाचा पहिला हफ्ता 3 हजार 500 रुपये जाहिर करावा, अन्यथा 21 तारखेनंतर सर्व ऊस वाहतूक रोखण्यात येईल, अशा इशारा शेतकरी नेत्यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

साखर कारखानदार एकत्र आलेत, त्याच पद्धतीने शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येणार

सर्व साखर कारखानदार ऊस दर या मुद्यावर आतून एकच असून शेतकऱ्यांची लुट यांनी चालवलेली आहे, तोच लुटीचा पैसा हे कारखानदार निवडणुकांमधे उधळतात, या पुढे कोणत्याही साखर कारखान्याचा प्रचार कोणत्याही निवडणूकीत करणार नाही अशीही भुमीका शेतकरी नेत्यांनी मांडली आहे. केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी रिकव्हरीचा बेस मात्र कमी केलेला आहे. साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमधे कोणतीही वाढ केलेली नाही ती वाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. ज्या पद्धतीने हे साखर कारखानदार एकत्र आले आहेत, त्याच पद्धतीने आम्ही सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा एकत्र आलो आहोत. ऊसाचा दर जाहिर करा अन्यथा 2012-13 साली सोलापुर जिल्ह्यात झालेल्या ऊसदर आंदोलनाची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी शेतकरी नेत्यांनी दिली आहे.  

सर्व शेतकरी पाठीशी उभी राहिले तरच चांगला दर मिळेल

सर्व शेतकरी पाठीशी उभी राहिले तरच चांगल्या पद्धतीने कोल्हापुर, सांगली, कर्नाटक या पद्धतीने आपल्याही ऊसाला भाव या कारखानदारांकडून घेऊ. गेली 25 वर्ष सातत्याने या साखर कारखानदारांच्या विरोधात संघर्ष करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. चळवळीमधे पुढच्या पिढीनेसुद्धा सामिल झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या पोरांनी साखर कारखानदारांच्या, पुढाऱ्यांच्या मागे न फिरता हक्कासाठी लढायला शिकलं पाहिजे अशी भावना या वेळी त्यांनी व्यक्त केली. सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिपक भोसले यांनी यावेळी काही ठराव मांडले त्याला शेतकऱ्यांनी हात वर करुन मंजुरीही दिली. 

Continues below advertisement

21 तारखेपर्यंत ऊसाचा पहिला हफ्ता 3 हजार 500 रुपये जाहिर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार

21 तारखेपर्यंत ऊसाचा पहिला हफ्ता 3 हजार 500 रुपये जाहिर करावा. अन्यथा 21 तारखेनंतर सर्व ऊस वाहतुक रोखण्यात येईल. तसेच पालकमंत्री, सर्व मंत्र्यांना जिल्हाबंदी करु. सर्व कारखान्यांनी वाहतुक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंतरानुसार निश्चित करावा. दोन कारखान्यातील 25 किलोमीटरची  हवाई अट रद्द करण्यात यावी. साखरेची किमान आधारभूत किंमत 45 रुपये करण्यात यावी. टोळी मुकादमांनी फसवणूक केलेले पैसे गोपिनाथ मुंडे महामंडळातुन सदर वाहनमालकास मिळावेत. अतिवृष्टीतुन भंडीशेगाव मंडल वगळण्यात आले असून त्याचा समावेश करुन मंडलातील सर्व शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी. सरकारने निवडणूकीवेळी दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पाळून सरसरकट कर्जमाफी करावी, असे ठराव करण्यात आले. यावेळी पंढरपुर, माढा, मंगळवेढा तालुक्यातील बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते.

या ऊस परिषदेला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या ऊस परिषदेतुन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत काही ठराव सुद्धा घेण्यात आले आहेत. यावेळी रयत क्रांतीचे दिपक भोसले, प्रा. सुहास पाटील, स्वाभिमानीचे सचिन पाटील, समाधान फाटे, नवनाथ माने, धोंडीराम घोलप, तानाजी बागल, रणजित बागल, निवास नागणे उपस्थित होते.