सोलापूर : रोजगार देण्याच्या बहाण्यानं सोलापुरात कामगारांची फसवणूक झाल्याचा आरोप शासकीय रुग्णालयावर होत आहे. कामगारांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि धक्कादायक वास्तव समोर आलं. नसबंदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामगारांनाच सावज करण्यात आलं.


सोलापुरातल्या आरोग्य खात्याच्या अजब कारभारामुळं एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरात जे घडलं ते ऐकून संताप अनावर झाल्याशिवाय राहत नाही. नसबंदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामगारांनाच सावज करण्यात आलं. कोंडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्यातच दोन हजाराचं आमिष दाखवून केवळ हजार रुपये देऊन या कामगारांना घरी सोडण्यात आलं आणि काही तासातच त्रास सुरु झाला. काम देण्याच्या बहाण्याने नेलं, शुद्धीवर आल्यानंतर घरी परतलो आणि तेव्हा हा प्रकार लक्षात आला, असा दावा कामगाराने केला आहे.

रोजंदारीवर लक्ष्मण चौगुलेच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. चार दिवसांपासून तो कामावर गेला नसल्यानं घरातली चूलही पेटलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बिगारी कामगार संघटनेनं केली आहे. तर नसबंदीची शस्त्रक्रिया जबरदस्तीनं झाली नसल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

लक्ष्मण चौगुलेच्या माध्यमातून सोलापुरातलं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामागे मोठं रॅकेटही कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आणखी किती कामगारांची फसवणूक करुन त्यांची नसबंदी करण्यात आली, हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची गरज आहे.