सोलापूर: सोलापूरच्या रिधोरे गावात दीडशे वर्षापासून गायकवाड कुटुंब एकत्र नांदत आहे. या कुटुंबात सध्या ४७ सदस्य आहेत. दीडशे एकर शेती, शेतात रोज २० शेतमजूर. घराचं वार्षिक बजेट ४५ लाख.


घराला दरवर्षी एक नवा कारभारी मिळतो. तो सांगेल ती पूर्वदिशा. याही घरात सासू-सुनांचे, भावा-भावांचे मतभेद होतात, मात्र मनभेद होत नाहीत. एवढं मोठं कुटुंब ज्या गुण्या-गोविंदाने नांदतय, ते बघून अनेकांना नॉस्टेलजिया होईल.

दीडशे वर्षापूर्वी कोंडिबा गायकवाड यांच्यापासून सुरु झालेला हा वंश विस्तार आहे. पाच भाऊ, त्यांच्या बायका, पाच जणांना मिळून ८ मुले, त्यांच्या बायका, सगळ्यांची मिळून १६ मुले, असं एकूण ४७ जणाचं हे कुटुंब.



स्वंयपाकापासून कपडे खरेदीपर्यंत सगळे व्यवहार एकत्रित. यासाठी सगळं क्रेडिट घरातील महिलांना जातं. त्यांच्यामुळे सगळं घर एकत्रित असल्याचं कुटुंबप्रमुख सांगतात.

घरातल्या पाचही सासवा पहाचे पाच उठतात, सुनांना सात वाजता उठण्याची मुभा. रोज सकाळी ६० चपात्या, २० भाकऱ्या लागतात.  तेवढाच स्वंयपाक संध्याकाळी.

चार दिवस एकीनं चपत्या भाकरी कराच्या, दुसरीनं भाजायच्या. तिसरीनं भाज्या चिरायच्या. भाजी चिरणारीने सकाळी ९ चा ३० ते ३५ कप चहा करायचा. तीनेच चहाची भांडी घासायची.



एकीने भाजीला फोडणी द्यायची, स्वंयपाक घरात एकावेळी ६ जणींची ड्युटी असते. उरलेल्या दोघींपैकी एकीने कपडे धुवायचे, एकीने वाळत घालायचे.

कोडींबा गायकवाडापासून वंशवेल सुरु होते..

*कोडींबाना तीन मुले

*दिंगबर-गजेंद्र-पुतळबाई

*दिगंबर यांना चंद्रकांत-पोपटराव-भास्कर-पंडीत आणि किशोर

*चंद्रकांत-राजामती या दांमत्याला मिळून सुनंदन, सुनील, विजय मुलं

*पोपटराव-कांता या दोघांना सुवर्णा, सुशील, संजय ही मुले

*भास्कर-तारामती- सुनंदा, वैशाली, दिपाली, आबासाहेब

*पंडीत यांची पत्नी उषा

*किशोर-शारदा या दोघांना अतुल-अमर ही दोन मुले

सणासुदीला पै-पाहुण्यांसाठी घर पुरत नाही. अशा घरात १६ घरातून आलेल्या १६ जणींचं एकमत होणं कसं शक्य आहे. या घरातही मतभेद होतात, पण मनभेद नाही.

चंद्रकांतराव १० वर्षे सरपंच होते. सध्या रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत. पोपटरावही ५ वर्षे सरपंच होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.



भास्कररावांनी शेती केली. पंडीतराव शाळेत सेवक आहेत. किशोरराव लघुपाटबंधारे विभागात मस्टर कारकुन. सुनंदन कोल्हापूरला एलआयसीत असिस्टंट मॅनेजर आहेत.  सुनील डीसीसी बँकेत शाखाधिकारी. विजय गुजरातला केमिस्ट. सुशील माजी सैनिक आहेत,  संजय बँकेत शाखा उपव्यवस्थापक, आबासाहेब माध्यमिक शिक्षक, बाकीचे भाऊ शेती करतात.

वडिलोपार्जीत १४० एकर शेती आहे. त्यापैकी ६० एकरवर ऊस. ४ एकर डाळिंब. १ शेडनेट आहे. साडेतीन कोटी लिटर क्षमतेचं शेततळं. तीन ट्रॅक्टर, ३ चार चाक्या आणि १४ दुचाकी आहेत. रोज २० शेतमजूर कामाला असतात. घराचं वार्षिक बजेट ४० लाख.



दरवर्षी नवा कारभारी म्हणून घर टिकल्याचं कुटुंबातील सदस्य सांगतात.

तर मी सैन्यात, पण घर एकत्रित राहिल्याने कुटुंबाला आधार मिळाला, असं सुशिल गायकवाड यांचं म्हणणं.

२००० सालापर्यंत चंद्रकांतराव एकहाती निर्णय घेत होते. १६ वर्षापासून पुढच्या पिढीतला एक जण दरवर्षी कारभारी होतो. तो सांगेल ती पूर्वदिशा. महिन्याकाठी १० हजाराचा किराणा, ५ हजाराचं इंधन, ५ हजाराचा भाजीपाला लागतो.

पुढच्या पिढीतल्या ८ जणांपैकी दोघे किराणा. एक जण भाजीपाला, १ भाऊ इंधन, एक जण घरातला किरकोळ खर्च बघतो.



घरातली 16 मुलं सकाळ-संध्याकाळ एकत्रित जेवतात. रोज संध्याकाळी सात वाजता सगळं कुटुंब हरीपाठ पठण करते.

आधी छोट्यांची पंगत उठते, नंतर घराबाहेर जाणारी पुरुष मंडळी एकापाठोपाठ एक जेवायला बसतात. कार्यक्रम असेल तर एकत्रित. त्यानंतर सुना आणि आणि शेवटी पाच सासू.

थोरले पाच भाऊ आता काही करत नाहीत. पुढच्या पिढीतल्या आठ पैकी सात जण पदवीधर आहेत. पण एकही जण सुपारी सुध्दा खात नाही हे या कुटुंबाचं वैशिष्ट्य.