सोलापूर/ मुंबई : सोलापूर महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ काल झालेली पाहायला मिळाली. पालिकेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसला. विरोधीपक्ष नेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगत शिवसेनेला राम राम ठोकला. कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. कोठे यांचा आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती. शरद पवार यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून महेश कोठे यांचा प्रवेश झाला अशी पोस्ट देखील आली. मात्र नंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली. आज एकूणच महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशवरून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश मात्र झालाच नाही. त्यामुळं कोठे नेमके कोठे? असा सवाल उपस्थित होत आहे.


बंडखोरी, विरोधीपक्ष नेतेपद आणि पक्षांतर
महेश कोठे हे सोलापूरातील शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षातर्फे कोठे यांना डावलून मानेंना विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. पक्षावर नाराज असलेल्या कोठेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक देखील लढवली. मात्र त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर देखील पालिकेतील विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी महेश कोठे यांच्यावर कायम होती. नाराज असलेल्या कोठेंनी अखेर शिवसेना सोडत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.


शरद पवारांची 'ती' पोस्ट डिलिट
आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी स्वत: दिली होती. महेश कोठे यांचा आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती. पण त्यांच्याऐवजी इतर काही मान्यवरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केले. असं असतानाही शरद पवार यांच्या अधिकृत हँडल वरून महेश कोठे यांचा प्रवेश झाला असे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट आली. मात्र नंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली. पक्ष कार्यालयाने नंतर स्पष्ट केले की असा पक्ष प्रवेश झालेला नाही. सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमकडून चुकून हे ट्वीट झाले असे स्पष्टीकरण सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी दिलं. सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा स्वतः कोठे यांनी केली होती. मात्र काही कारणामुळे आज त्यांचा प्रवेश झालाच नाही.


सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेला झटका; विरोधी पक्षनेते महेश कोठे करणार राष्ट्रवादीत प्रवेश


राष्ट्रवादीचं "जनवात्सल्य" मिळण्यापासून कोठेंना कुणी रोखलं?
महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशवरून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगत महेश कोठे कालच सोलापुरातून कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन मुंबईला रवाना झाले. इकडे सोलापूर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतरच महेश कोठे यांचा राष्ट्रवादीचा प्रवेश लांबणीवर गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कोठे यांचा प्रवेश लांबणीवर जाण्यामागे ही बैठक कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. मात्र जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी त्यास नकार दिला. मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांची सहज भेट घेतली होती असे स्पष्टीकरण बरडे यांनी दिले. तर आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन बरडे यांनी महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे देखील जाहीर केलं. आता कोठे यांचा प्रवेश न झाल्याचं कळताच बरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी काँग्रेस त्यानंतर शिवसेनासोबत विश्वासघात करून राष्ट्रवादीत जाऊ पाहणाऱ्या महेश कोठे यांचा प्रवेश रोखल्याबद्दल मानाचा मुजरा, अशी प्रतिक्रिया सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली आहे.


पडद्यामागे काय घडलं असेल
शरद पवार यांनी आपल्या भाषणात कोठेंचं कौतुक केलं होतं. शरद पवार आणि महेश कोठे यांची याआधी देखील भेट झाली होती. मग आताच प्रवेश रोखण्यात का आला? असा सवाल उपस्थित होतोय. काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये भेट झाली. या बैठकीनंतर प्रवेश थांबल्याच्या चर्चा सुरू झाल्या, मात्र बरडे यांनी त्यास नकार दिला होता. तसेच पारनेर पक्षांतर प्रकरणानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यामुळं तर कोठेंचा प्रवेश रोखला नाही ना? अशा चर्चा आहेत.


कोण आहेत महेश कोठे?


महेश कोठे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय कै. विष्णुपंत कोठे यांचे सुपुत्र
मात्र 2014 च्या विधानसभेआधी महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत मध्य विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली
मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला
2017 च्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोठे यांच्यामुळे शिवसेनेला चांगले यश प्राप्त झाले
22 नगरसेवक निवडून आल्याने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेना सोलापूर पालिकेत
यापैकी 7 नगरसेवक हे कोठे यांच्या परिवाराशी निगडित, मुलगा, पुतण्या, बहीण हे त्यात आहेत
महेश कोठे यांची निवड विरोधीपक्ष नेते पदी करण्यात आली
2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांचं शिवसेनेने तिकीट कापलं
पक्षासोबत बंडखोरी महेश कोठे यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यात अपयशी झाले
आमदार होण्यासाठी इच्छा पूर्ण न झाल्याने आता कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करू पाहात आहेत