सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळत आहेत. पालिकेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसतोय. कारण पालिकेचे विरोधीपक्षनेतेच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. विरोधीपक्ष नेते महेश कोठे हे विधानसभा निवडणुकांपासून नाराज होते. उद्या मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची माहिती स्वत: महेश कोठे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


महेश कोठे हे सोलापूरातील शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षातर्फे कोठे यांना डावलून मानेंना विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. पक्षावर नाराज असलेल्या कोठेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक देखील लढवली. मात्र त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर देखील पालिकेतील विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी महेश कोठे यांच्यावर कायम होती.


मात्र नाराज असलेल्या कोठेंनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी स्वत: दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला कायम आदर होता. तो पुढे देखील राहिल. पक्ष वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती. विधानसभेच्या जागेवर माझा हक्क होता. मात्र मला संधी न देऊन डावलण्यात आलं. तेव्हापासून मी नाराज होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी भेटण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र मधल्या काही लोकांनी भेट देखील होऊ दिली नाही. मी राष्ट्रवादीत जरी प्रयत्न करत असलो, तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलाताना कोठे यांनी दिली.


पाहा व्हिडीओ : शिवसेनेचे सोलापुरातील नगरसेवक महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार



एमआयएमचे नेते देखील काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करतील : महेश कोठे


पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्याला दिल्याने नाराज असलेले एमआयएमचे नेते नगरसेवक तौफीक शेख हे देखील आपल्या नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. या बाबत देखील महेश कोठे यांनी प्रतिक्रिया दिली. "एमआयएम नेत्यांचा प्रवेश हा माझ्या आधी होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश रखडला आहे. येत्या 15 ते 20 दिवसात त्यांचा देखील प्रवेश होण्याची शक्यत आहे." अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांनी दिली.


वडीलांचा निर्णय हा वैयक्तिक, आम्ही शिवसेनेतच राहणार : नगरसेवक प्रथमेश कोठे


महेश कोठे यांच्या परिवारातील काही सदस्य देखील सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक आहे. मुलगा प्रथमेश कोठे, पुतणे देवेंद्र कोठे, बहीण कुमुद अंकाराम, जावई विनायक कोंड्याल हे सोलापूर महानगर पालिकेचे शिवसेनेचे सदस्य आहेत. परिवारातील हे सदस्य देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. "प्रत्येकाला निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य आहे. मी कोणत्याही प्रकारे परिवारातील सदस्यांवर सोबत प्रवेश करण्यासाठी बळजबरी केलेली नाही." अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांनी दिली. तर "वडीलांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही परिवारातील सदस्य शिवसेनेतच आहोत. पुढे देखील पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करु" अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांचा मुलगा नगरसेवक प्रथमेश कोठे याने दिली.


पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी अमोल शिंदे यांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरु


महेश कोठे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्याकडील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट करण्याच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांची विरोधीपक्ष नेते पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांनी अमोल शिंदे यांनी तसा शिफारस पत्र विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केल्याची माहिती नगरसेवक अमोल शिंदे यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतरित्या महानगरपालिकेस पत्र येण्यास साधरण दोन दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महेश कोठे यांच्या प्रवेशावरुन शिवसेना नेत्यांनी विविध भावना व्यक्त केल्या. "महेश कोठे पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र त्यांनी जाण्याचाच निर्णय घेतला असले तर त्यांची अडवणूक आम्ही करु शकत नाही. त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्यामुळे सेनेला थोडासा फटका बसला तरी आम्ही पालिका निवडणुकीत कसर भरुन काढू" अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी दिली. तर "महेश कोठे विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेल्यामुळे नाराज होते. त्यांनी बंडखोरी केली तर पक्षाने त्यांचेकडे असलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी कायम ठेवली होती. विधानसभा निवडणुकीत संपर्क प्रमुखांनी महेश कोठे यांचं तिकीट कापलं होतं. संपर्क प्रमुखांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम आहे." अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख पुरषोत्तम बरडे यांनी दिली.