मुंबई : महाराष्ट्रात कालपासून सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. आजही मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता चक्क छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे.  नाशिकमध्ये अनेक ठिकाणी द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मक्याचं पिक झोपलंय तर कांदा खराब झाला आहे.


मुंबई, पुण्यात पावसाची हजेरी
मुंबईतील काही भागात तसेच नवी मुंबई, पनवेलसह मुंबई उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तसंच बऱ्याच भागात ढगाळ वातावरण होतं. पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवडमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली.


नाशिकमध्ये अनेक ठिकाणी द्राक्षबागा उध्वस्त
ऐन थंडीत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय मात्र याच अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. मक्याचं पिक झोपलंय तर कांदा खराब झाला आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती खास करून सिन्नर, निफाड या भागात तर वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाल्याने द्राक्षबागा अक्षरशः उध्वस्त झाल्या. नाशिकची ओळख तशी द्राक्षनगरी मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आली आहेत.


द्राक्षापाठोपाठ नाशिकमध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जात मात्र पावसाचा या कांद्याच्या पिकाला देखील चांगलाच फटका बसला असून ही पिकं खराब झाली आहेत. आधीच कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक संकटात सापडला असून कुठेतरी भाव मिळेल या आशेने तो जगतोय आणि त्यात अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे..


द्राक्ष, कांदा यापाठोपाठ गहू, मका, हरभरे, डाळिंब यासह भाजीपाल्याचही या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. वाईट बाब म्हणजे वर्षभर उभं केलेलं गव्हाचं आणि मक्याचं पिक दोन तासाच्या पावसाने पूर्णपणे झोपलंय. आधीच लॉकडाऊनचा फटका, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता हा बेमोसमी पाऊस या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला असून देवाने आता जास्त अंत पाहू नये यासोबतच मायबाप सरकारने काहीतरी मदत करावी अशीच अपेक्षा तो व्यक्त करत आहे.

भिवंडीत खराब हवामानामुळे आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव


खराब हवामानामुळे आंब्यावर रोगांचे प्रादुर्भाव दिसून येत आहे. आंब्यावर भुरी ,तुडतुडे सारखे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय मोहरांचा फुलोरा कोमजुन काळपट पडून जाऊन गळत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. भिवंडी तालुक्यात विविध परिसरात 200 हेक्‍टर जमिनीवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे मात्र या वर्षी वातावरणात अनेक बदल होत गेले अधूनमधून पाऊस ही पडतोय त्यामुळे आंब्याच्या बागेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गाकडून उचित मार्गदर्शन करण्याची मागणी केली जात होती त्या अनुषंघाने तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी आंब्याच्या बागेत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.