सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी निवडणुकीसाठी सादर केलेला जातीचा दाखला अवैध ठरला आहे. सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय दिला आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार अक्कलकोट यांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावाचे बेडा जंगम या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश ही समितीतर्फे देण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी जाणार की राहणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. काय आहे पुढील प्रक्रिया जाणून घेऊया.


आता पुढील प्रक्रिया काय?

  • तहसीलदार, अक्कलकोट हे न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांच्याकडे लिखित फिर्याद दाखल करणार

  • या दाखल अहवालानुसार न्यायदंडाधिकारी, सोलापूर(जिल्हाधिकारी) कारवाईचे आदेश देऊ शकतात

  • खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात येऊ शकते

  • जात वैधता पडताळणी समिती, सोलापूर यांनी दिलेला निकाल अमान्य असून त्यावर स्थगिती करून रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते

  • उच्च न्यायालयात दोन्ही पक्ष तसेच समितीच्या निर्णयावर पुन्हा सुनावणी होऊन निर्णय येईल

  • नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार कायदेशीर प्रक्रियेमुळे निकाल येण्यास विलंब होण्याची शक्यता जास्त

  • उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही दोन्ही पक्षांकडे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले असतील

  • न्यायालयांच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यावरच निवडणूक आयोग कार्यवाही करणार

  • खासदारकीच्या काळात जर जात पडताळणी समितीचा निर्णय कायम राहिला आणि जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले तर आपोआप खासदारकी रद्द होऊन पोट निवडणूक लागण्याची शक्यता

  • कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात निर्णय आल्यास केंद्रीय निवडणूक आयोग वेतन आणि भत्ते जमा करण्याचे निर्देश देऊ शकतो


सोलापुरात भाजपला धक्का; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला अवैध

काय आहे प्रकरण?
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र, हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली. त्यावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा राखून ठेवलेला निकाल 24 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 आणि 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुनी संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्त दक्षता समितीमार्फत चौकशी करण्यात यावी असा अर्ज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वकील अॅड. संतोष नाव्हकर यांनी केला. मात्र, जिल्हा जात पडताळणीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पुर्ण झाल्याचे कळविले.

Majha 20-20 | ठाकरे सरकार 11 दिवसांत कोसळणार : नारायण राणे | ABP Majha